लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड मेहनत व सत्याच्या मार्गावर असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या डगमगत नाही. संघर्ष व चिकाटी ही दोन गुण आत्मसात करून संघर्षमय मार्गाने यश खेचून आणण्याचे अनन्यसाधारण काम ती व्यक्ती करीत असते. असाच संघर्षमय जीवन प्रवासातून फुलमोगरा येथे स्थित महर्षि विद्या मंदिरच्या प्राचार्या श्रृती ओहळे यांनी भविष्यकालीन सुजाण नागरिकांची पिढी घडविली आहे.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. बुधवारी आयोजित होत असलेले शिक्षक दिनानिमित्त प्राचार्या ओहळे यांची शैक्षणिक व सामाजिक जीवनातील संघर्षावर मिळविलेल्या यशाची ही थोडक्यात माहिती.प्राचार्या श्रृती ओहळे यांचा जन्म पुरोहित कुटुंबात झाला. एक भाऊ-व सहा बहिणींच्या उपस्थितीत शिक्षण घेणे अडचणीचेच. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असतानाही वयाच्या १९ व्या वर्षी नोकरी करून प्रतिकुल परिस्थितीत एमएससी अभ्यासक्रम पूर्ण केले. लग्नानंतरही सासरच्या मंडळींचे उत्तम सहकार्य लाभल्याने पुढील अभ्यासक्रम पूर्ण केला. महर्षि विद्या मंदिरात प्राचार्य पदावर आल्यावर ३०० विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली शाळा आजघडीला विद्यार्थी संख्या अडीच हजारांच्यावर पोहचली आहे.विविध माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडविणे हा प्रमुख उद्देश ठेऊन प्राचार्य ओहळे यांनी विद्यार्थ्यांच्या लहान सहान बाबींवरही लक्ष केंद्रीत केले. पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी वेळोवेळी मार्गी काढल्या. शाळेत ध्यान, योग, कराटे याशिवाय सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना निपून बनविले. हा प्रयत्न आजही इमाने इतबारे सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची गाठलेली मजल हीच त्यांच्या यशाची व मेहनतीची पावती आहे.प्ले स्कूल ते इयत्ता १२ वी पर्यंतचे विविध माध्यमातील शिक्षण महर्षिंच्या आशिर्वादाने दिले जात आहे. शाळेची प्रशस्त इमारत तथा सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्राचार्य ओहळे यांनी महर्षि विद्या मंदिर समुहाचे अध्यक्ष महर्षि गिरीशचंद्र वर्मा यांच्याकडे मागणी केली होती. गुरूंच्या आशिर्वादाने ओहळे यांनी केलेली मागणी पूर्ण झाली. प्रांतीयसह राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमात महर्षिच्या विद्यार्थ्यांची घेतलेली भरारी या मागचे एकमेव प्रेरणास्थान म्हणजे प्राचार्य ओहळे यांची मेहनत होय. विशेष म्हणजे या सर्व यशासोबत महर्षि विद्या मंदिर शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय सहकार्य आहे. अशा गुरूवर्य असलेल्या प्राचार्य ओहळे यांना माजी राष्ट्रपती स्व.ए.पी.जे. अब्दुल कलाम 'बेस्ट प्रिन्सीपल अवॉर्ड'ने गौरवान्वित करण्यात आले आहे.
संघर्षातून घडविताहेत सुजाण नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 9:57 PM
प्रचंड मेहनत व सत्याच्या मार्गावर असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या डगमगत नाही. संघर्ष व चिकाटी ही दोन गुण आत्मसात करून संघर्षमय मार्गाने यश खेचून आणण्याचे अनन्यसाधारण काम ती व्यक्ती करीत असते.
ठळक मुद्देशिक्षक दिन विशेष : प्राचार्य श्रृती ओहळे यांची यशोगाथा