इंद्रपाल कटकवार
लाखनी : वेळ सकाळी १० वाजताची. स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय. बाह्य रुग्ण विभागाच्या नोंदणी कक्षासमोर चार ते पाच व्यक्तींची रांग. कर्मचारी, परिचारिका यांची धावपळ. सफाई कामगारांकडून स्वच्छतेच्या कामावर अखेरचा हात फिरविणे सुरू. मात्र कायम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी गजबजून राहणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव दिसत होता.
देशाला हादरवून टाकणाऱ्या अग्निकांडानंतर सोमवारी अर्थात तिसऱ्या दिवशी लोकमतची चमू रियालिटी चेकसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचली. दोन दिवस पोलिसांच्या गराड्यात असलेल्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर केवळ सुरक्षारक्षक होता. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच आतमध्ये सोडत होता. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. बाह्यरुग्ण नोंदणी कक्षासमोर चार ते पाच व्यक्ती चिठ्ठी काढण्यासाठी रांगेत उभे होते. तर कधीही न दिसणारे कर्मचारी रुग्णालयात सकाळीच आल्याचे जाणवत होते. रुग्णालयाच्या इमारतीची साफसफाई अंतिम टप्प्यात आली होती. कर्मचारी साफसफाई करताना दिसत होते.
आहार सल्ला कक्षासमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या कामाच्या निमित्ताने आल्या होत्या. मात्र या कक्षात कुणीही उपस्थित नव्हते. ६ जानेवारीपासून आम्ही नियमित येतो. परंतु काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. सोनोग्राफी विभागाच्या समोर महिला हातात कागद घेऊन सोनोग्राफीची प्रतीक्षा करीत होत्या. शल्य विभागात सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. लोकमत चमू रुग्णालयाच्या मुख्य द्वाराजवळ पोहचली. तेव्हा चौकशी कक्षातील कर्मचाऱ्यांनी थांबविले. कुठे जाता, कशासाठी आले, असे विचारत त्यांनी पोलिसांना बोलाविले. ५ ते ६ पोलीस कर्मचारी क्षणार्धात त्या ठिकाणी पोहचले. चौकशी करून विशेष नवजात दक्षता विभागाकडे जायचे नाही, असे बजावले. हा वाॅर्ड रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर आहे. याच माळ्यावर शनिवारच्या पहाटे अग्नितांडव घडले होते. त्यावेळी १० कोवळ्या निष्पापांचा बळी गेला. त्यामुळे या कक्षाकडे कुणालाही जाऊ दिले जात नव्हते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या परिसरातही धावपळ दिसत होती.
१०.१५ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते काही अधिकाऱ्यांसोबत घाईघाईने वाॅर्डाकडे जात होते. त्यावेळी लोकमतची चमू पाहून त्यांनी नमस्कार केला आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना येथे गर्दी कशाची, असा प्रश्न करीत पुढे निघाले. त्यांच्या चेहऱ्यावर या घटनेचा संपूर्ण ताण दिसत होता. यानंतर लोकमतची चमू प्रसूतिपश्चात कक्षाकडे पोहचली. अग्निकांडानंतर हा कक्ष तात्पुरता नेत्र विभागात हलविण्यात आला. या कक्षाच्या समोर ओल्या बाळंतिणीच्या नातेवाईक आपल्या पिशव्यांसह बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर शनिवारच्या पहाटेच्या घटनेची छाया दिसत होती. बोलण्याचा विषयही तोच होता. नेत्र कक्षात प्रसूत झालेल्या सात मातांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या कक्षाला असलेले दार तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. बाजूच्या कक्षात काही परिचारिका जोरजोराने बोलताना दिसत होत्या. कोरोना ब्लाॅकच्या परिसरात नीरव शांतता दिसत होती. ब्लाॅकच्या प्रवेशद्वारावर दोन व्यक्ती रजिस्टर घेऊन बसलेल्या होत्या.
रुग्णालयाच्या आवारात सफाई कर्मचारी सफाईचे काम करताना दिसत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांची तुरळक गर्दी होती. एरवी रुग्णालय परिसर रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या गर्दीने फुललेला असतो. परंतु गत तीन दिवसांपासून या परिसरात कुणी फारसे भटकताना दिसत नाही. दोन दिवस तर संपूर्ण सरकारच रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे सुरक्षा कडेकोट होती. सोमवारी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर वगळता कुणीही नेते आले नाही. त्यामुळे रुग्णालय परिसरात फारशी सुरक्षा नव्हती.
४० वर्षे जुनी इमारत
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत ४० वर्षे जुनी आहे. ६ फेब्रुवारी १९८१ रोजी या इमारतीचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री हरिभाऊ नाईक उपस्थित होते. गत ४० वर्षापासून या इमारतीत फारशा सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. आता या घटनेनंतर इमारतीची रचना आणि कोंदटपणा पुढे येत आहे.