नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यातील खरिपाचा धान आधारभूत केंद्रावर सुमारे एक कोटी क्विंटल पडून होता. खरीप हंगामात निसर्गाच्या दृष्टचक्राने धानाचे पीक परिपूर्ण झाले नव्हते. मावा व तुडतुड्याने धान पीक पोचट झाले. पर्यायाने अर्धवट भरलेला धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या गेला. त्याची भरडाई करण्यात आली. तेव्हा मात्र अपेक्षित असलेली शासकीय नियमानुसार ६७% उतारी आली नाही. सुमारे तीस हजार रुपयांचा नुकसान मिलर्स यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सुरू झालेली भरडाई पुन्हा बंद करण्यात आली. मिलर्स संघटनेने भरडाई न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांत खरिपाचे धान पडून होते. भंडारा जिल्ह्यात सुमारे ३६ लक्ष क्विंटल धान गुदामात व गुदामाबाहेर पडून होते. १ मे हा उन्हाळी धान खरेदीचा मुहूर्त येऊन ठेपला, मात्र खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. शेतकरी वर्गाने उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता आपल्या लोकप्रतिनिधींकडे विनवणी केली. आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत उन्हाळी धान खरेदी करण्याची विनंती करण्यात आली. पटेल यांनी अन्न पुरवठामंत्र्यांशी चर्चेतून सकारात्मकतेने प्रश्न सोडवला. मिलर्स युनियनचीसुद्धा मनधरणी करीत शेतकरी वर्गाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले. मिलर्स युनियनने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शब्दाला मान देत भरडाई सुरू केली. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसांत आधारभूत केंद्र उन्हाळी धानाकरिता सुरू होतील, अशी आशा बळावली आहे.
बॉकस
लाखनी तालुक्यात चुलबंद खोऱ्यात गत पंधरा दिवसापासून उन्हाळी धानाचा मळणी हंगाम सुरू झालेला आहे. आधारभूत केंद्र सुरू होण्याची आशा धूसर दिसत असल्याने शेतकरी बांधवांनी खाजगी व्यापाऱ्याला १४४० पर्यंत धान विकले आहेत. शेतकरी आर्थिक टंचाईत असल्याने नफा तोटा न बघता सुमारे ४५० रुपये प्रति क्विंटलचा तोटा सहन करीत हंगाम आटोपता घेतला आहे. अजूनही ५० टक्केच्या वर हंगाम शिल्लक असून आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत आहे.