पैसेच नाहीत, तर रोवणी करावी कशी : शेतकऱ्यांचा सवाल
तुलसीदास रावते
पवनारा : उन्हाळी धान खरेदीकरिता गोडाऊनची कमतरता असल्याने जिथे जागा मिळेल तिथे उन्हाळी धान खरेदी करण्यात आली. यात घर, सभामंडप व शाळेतही धान खरेदी केली. शाळा सुरू होईल म्हणून धानाची उचलही करणे सुरू झाले; परंतु धानाचे चुकारे कधी मिळणार,
पैसेच नाहीत, तर रोवणी कशी करावी, खत मजुरी, ट्रॅक्टरकरिता पैसे कोठून आणावेत, असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत.
जुलै महिना संपत आला आहे. दोन, चार केंद्रे सोडून जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांचे धान चुकारे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाहीत. यात पवनारा केंद्रावर २४ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. यापैकी काही धान जि. प. शाळेत ठेवण्यात आले. शाळा सुरू होईल म्हणून गुरुवारी उचल करणे सुरू झाले, तेव्हा शेतकऱ्यांनी एकच सवाल केला आमचे चुकारे कधी मिळणार? रोवणीचा हंगाम सुरू झाला. खत, ट्रॅक्टर, मजुरी इत्यादी खर्चाकरिता पैसे आणावेत कोठून, असा प्रश्न आहे.
उन्हाळी धान रोवणीपासून धान खरेदी केंद्रावर विकेपर्यंत शेतकऱ्याला अवाढव्य खर्च आलेला आहे. बँक, पतसंस्था, सावकार आदींकडून कर्ज घेऊन शेती पिकविली. धान विकून सर्वांना परतफेड करण्याचे आश्वासन दिले. धान केंद्रावरही देण्यात आले; परंतु चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्याच्या डोक्यावर पुन्हा कर्ज वाढत आहे. पुन्हा खरीप धान रोवणीकरिता पैसे आणावेत कोठून, कोण देणार कर्जावर कर्ज? असे शेतकऱ्यांचे सवाल असून, तातडीने धान चुकारे देण्याची मागणी होत आहे.
300721\img_20210729_102708.jpg
उन्हाळी धान जि प शाळा पवनारा येथील उचल करताना