करडी (पालोरा) : यावर्षी निसर्गाने अनेकदा दगा दिला. दोनदा महापूर व कीड आणि रोगराईने धानाचा एकरी उतारा ५० टक्क्यांपेक्षा कमी बसला. अशा बिकट परिस्थितीत शासकीय केंद्रावर धानाची खरेदी झाली. परंतु भरडाईत ६५ टक्के पेक्षा कमी उतारा येऊन नुकसान होत असल्याने राईस मिलर्सनी धानाची उचल करण्यास नकार दिल्याने समस्येत आणखी भर पडली. परिणामी केंद्रांनी धान खरेदी मार्चच्या सुरुवातीला खरेदी बंद केली. उचल अभावी केंद्रावर लाखों क्विंटल धान उघड्यावर पडून आहेत. त्यामुळे उन्हाळी धानाची खरेदी होणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन गत दोन वर्षांपासून सतत दिले जात आहेत. निवडणुकांच्या काळात तर शेतकरी प्रत्येक पक्षाच्या केद्रस्थानी असतो. परंतु आजपर्यंत ना शेतकऱ्यांचे भले झाले ना शेतीचे. आश्वासन देणाऱ्यांचे उत्पन्न मात्र १०० पटीने वाढल्याचे दिसून आले. आजही शेतकऱ्यांची मुख्य समस्या सिंचनाबरोबर उत्पादित धान्य साठवून ठेवण्याची आहे. शासनाने धान खरेदी केंद्र वाढविले. परंतु धान्य साठवून ठेवण्यासाठी पर्याप्त गोडावून बांधकामाकडे कमालीचे दुर्लक्ष केले. साठवणुकीच्या असुविधेमुळे आजही शेतकरी कवडीमोल भावात धान्य विकण्यास मजबूर आहे. करडी परिसरात तर गोडावूनची स्थिती अतिशय वाईट आहे. बोटावर मोजण्या इतके गोडावून वगळता कुठेही गोदाम नाहीत. वारंवार मागणी करूनही या सुविधांकडे शासन प्रशासनाची डोळेझाक होत आहे. आज राईस मिलर्स धान भरडाईचा दर वाढविण्यासाठी तसेच धान खरेदी केंद्रांकडून मिळालेल्या धानाचा उतारा ६० टक्के पेक्षा कमी असल्याने नाराज आहेत. भरडाई दर वाढविण्याची व उतारा रेसो कमी करण्याची मागणी करीत आहेत. तर दुसरीकडे शासकीय आधारभूत किमतीवर खरेदी झालेला धान उचल थांबल्याने उघड्यावर पडून आहे. राईस मिलर्स व शासन - प्रशासनात तडजोड वेळीच न झाल्यास गंभीर पेच निर्माण होण्याची स्थिती आहे. खरिपातील धान पडून असताना व केंद्रांनी खरेदी बंद केलेली असताना उन्हाळी धानाची फसल परिपक्व होण्याच्या मार्गात आहे. मे महिन्याच्या प्रारंभी मळणी होऊन शासकीय केंद्रावर आवक होण्याची शक्यता आहे. परंतु गोडावूनचा अभाव व उघड्यावर असलेल्या धानामुळे धान खरेदी केंद्रांकडून खरेदीस नकार येण्याचा धोका वाढला आहे. या सर्व बाबींमुळे उन्हाळी धानाची खरेदी रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात लूट होण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दारावर उभा ठाकला आहे. यावर वेळीच निर्णय होण्याची आवश्यकता आहे.
कोट
उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न निर्माण होणार यात शंका नाही. त्यामुळे लवकरच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कालच जातीने मंत्री महोदयांकडे प्रश्न लावून धरला आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजकारण बाजूला सारून चर्चा करण्याची अपेक्षा आहे.
-राजू कारेमोरे , आमदार तुमसर.