०७ लोक १४ के
चंदन मोटघरे
लाखनीः तालुक्यात उन्हाळी धान पीक कापणीला प्रारंभ झाला आहे. तालुक्यातील धान शेतकऱ्यांनी खरीप पूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. उन्हाळी धान पीक खरेदीसाठी तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. खरीप धान खरेदी मार्च पर्यंत सुरू असल्याने धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊस फुल्ल आहेत.
तालुक्यात उन्हाळी धान पिकाची रोहिणी ३ हजार १८४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. तालुक्यातील कृषी मंडळ विभागानुसार लाखनी मंडळात ४४८.५० हेक्टर, पिंपळगाव (सडक) ५६४.०० हेक्टर, पोहरा ५७३.७० हेक्टर, मुरमाडी (तुपकर) ८०९.८० हेक्टर, पालांदूर (चौ.) ७८८.०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड केली आहे.
तालुक्यात भाजीपाला २५७.४८ हेक्टर क्षेत्रात, चारापिके ४८.२७ हेक्टर, उसखोडवा ३९.३० हेक्टर, कांदा ५.८० हेक्टर, मका १.६० हेक्टर, मूग २७.९५ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात ओलिताखालील क्षेत्र ९१०२ हेक्टर आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे. तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तालुक्यात सहकारी खरेदी-विक्री संस्थेद्वारे धान खरेदी केंद्र सुरू आहेत. सालेभाटा, जेवनाळा, पालांदूर, गुरढा, लाखनी, लाखोरी, पिंपळगाव (सडक) ,पालांदूर (चौ.), मुरमाडी (तुपकर) येथे धान खरेदी केंद्र आहेत. खरीप धानाची खरेदी २४ मार्च पर्यंत सुरू होती. धानाची गोदामे भरलेली आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी डीओ दिलेले नाही त्यामुळे उन्हाळी धानाची खरेदी करताना खरेदी केंद्रासमोर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा मिळण्यास उशीर होत आहे.
उन्हाळी धान खरेदीला शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा करण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित नसतात त्यांना कोरोना संरक्षणाची कामे दिलेली आहेत. त्यामुळे ऑनलाईन सातबाऱ्याला उशीर होत आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असल्याने मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
- मनोज पटले
उपसरपंच, परसोडी