जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली होती. आता धान काढणीला आला आहे; मात्र धान खरेदी केंद्राबाबत साशंकता निर्माण झाली होती. खरीप हंगामातील धानाची उचल भरडाईसाठी करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गोदाम हाउसफुल्ल आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामातील खरेदी केलेला धान कुठे ठेवावा, हा प्रश्न पणन महासंघापुढे निर्माण झाला होता. त्यामुळेच १ पासून साधारणत: सुरू होणारी खरेदी रखडली होती. आता १५ मे पासून धान खरेदीला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी दिली आहे.
गत खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात १५ आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धानाची खरेदी करण्यात आली होती. या केंद्रामध्ये खरेदी-विक्री सहकारी संस्था, दि पंचशिल भातगिरणी सहकारी संस्था, विजयलक्ष्मी राईस मिल व जवळपास ७ खासगी खरेदी केंद्रांचा समावेश होता. या सर्व केंद्रांतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानाची उचल न करण्यात आल्याने तालुक्यातील सर्व धान गोदामे तुडुंब भरली आहे. तालुक्याच्या काही भागात उन्हाळी धान कापणीस प्रारंभ करण्यात आला आहे. शासनाचे उन्हाळी आधारभुत धान खरेदी केंद्र येत्या १५ मे पासून सुरू होणार असल्याच्या माहितीवरून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
बाजार समितीला आधारभुत देण्याची मागणी
उन्हाळी धान खरेदी केंद्र देण्याची मागणी
गत खरीप हंगामात तालुक्यातील विविध संस्था अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रा अंतर्गत खरेदी केलेल्या धानाची अद्याप उचल झाली नाही. तालुक्यातील सर्व गोदामे तुडुंब भरले आहेत. अशा स्थितीत स्थानिक लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास एक लाख क्विंटल साठवण क्षमता असलेले ७ धान्य गोदामे उपलब्ध असल्याने सदर संस्थेला उन्हाळी धान खरेदी केंद्र देण्याची मागणी बाजार समिती प्रशासनासह तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.