लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिशिराच्या पानगळीत निष्पर्ण झालेल्या वृक्षांना वसंताची चाहूल लागली. आळसावलेला हिवाळा अंगमोडी देऊन टवटवीत उन्हाने सुखावला. तर सकाळ-संध्याकाळ कानात दवाचे डूल घालून थंडीही तोऱ्यात मिरवत आहे. लवकरच रखरखीत उन्हाने घामाच्या धारा निघतील. प्रत्येक जीव कसावीस होऊन शोधतील थंडगार विसावा.उन्हाळ्याची चाहूल लागली, पण रस्त्यावर अजूनही चहाच्या दुकांनाची गर्दी. थोड्याच दिवसात फुथपाटवर नव्याने मांडामांड होईल. चहा बरोबरच थंड पेयेही मिळतील. बसस्थानकांवर ‘थंड बॉटल’ अशी आरोळी कानावर पडेल. स्वेटर, मफलर, जर्किंग कपाटात जाऊन टोप्या, सनकोट, शेले बाहेर निघतील. गरीब कष्टकरी माणसं रखरखत्या उन्हात भिजलेल्या घामांनी चिंब होतील. कुल्फी, बर्फगोळा, आईसक्रीमचे आवाज रस्त्यारस्त्यावर ऐकायला येतील. कुठे रसवंतीच्या घुंगरांचा आवाज तर कुठे मिक्सरमधून निघणाºया थंडगार ज्युसची चव चाखायला मिळेल.उन्हाळा आणि हिवाळा अशा मिश्र वातावरणाचा अनुभव सध्या येत आहे. पहाटेच्या वेळी हवीहवीशी थंडी माणसाला आळसवत आहे. तर दहा वाजले की उन्ह चटके द्यायला सुरुवात होते. उन्हाळ्याच्या चाहुलीने माणूसच नाही तर निसर्गही मोहरुन गेला आहे. पानगळ संपून वसंताची कोवळी पालवी फुटेल. ओसाड माळरानावर आग ओकणारा पळस फुलेल. कडुनिंबाच्या हिरव्या गार सावलीने मन तृप्त होईल. अशात येणाºया सण समारंभातही सर्वजण सहभागी होतील. घामाच्या धारा टिपत लग्न समारंभ पार पडतील. जसजसा पारा वाढत जाईल तसतसा उन्हाळा नकोसा होईल. उन्हाळ्यात प्रत्येक जण गारव्याचा आश्रय घेईल. उन्हाळा नकोसा असला तरी निसर्गाच्या सृजनतेसाठी आणि धरतीला हिरवा शालू नेसविण्यासाठी आवश्यकच आहे. उन्हाळा लागतोय याची चाहुलच जणू निसर्ग देत आहे. निसर्गाच्या कालचक्राच्या परिणामाचा मानवाला सामना करावा लागतो. परिस्थिती बदलली की वागण्याचे आणि जगण्याचे संदर्भही बदलतात हेच खरे निसर्गाकडून शिकण्यासारखे आहे.
उन्हाळ्याची चाहूल पण थंडीचा तोरा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 9:38 PM
शिशिराच्या पानगळीत निष्पर्ण झालेल्या वृक्षांना वसंताची चाहूल लागली. आळसावलेला हिवाळा अंगमोडी देऊन टवटवीत उन्हाने सुखावला. तर सकाळ-संध्याकाळ कानात दवाचे डूल घालून थंडीही तोऱ्यात मिरवत आहे. लवकरच रखरखीत उन्हाने घामाच्या धारा निघतील. प्रत्येक जीव कसावीस होऊन शोधतील थंडगार विसावा.
ठळक मुद्देशिशिराची पानगळ : निष्पर्ण वृक्षांना पालवीची आशा