भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढायला लागली. कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्णसंख्या हाेती. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. एप्रिल महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली आणि रुग्णसंख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात तर दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत हाेते. मृत्यूचेही तांडव सुरू हाेते. सर्व भयभीत झाले हाेते. रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली हाेती. ऑक्सिजन मिळणेही कठीण झाले हाेते. अशा स्थितीत मे महिन्यापासून थाेडा दिलासा मिळायला लागला. जून महिन्यात तर काेराेना रुग्णांची संख्या अगदी कमी व्हायला लागली. ५०च्या आत काेराेना रुग्ण येऊ लागले.
रविवारी ८५९ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात लाखनी व साकाेली तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळला आहे. तसेच भंडारा, माेहाडी, तुमसर, पवनी व लाखांदूर तालुक्यात रुग्ण आढळून आलेला नाही.
जिल्ह्याचा रुग्ण बरे हाेण्याचा दर ९८.०५ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. गत महिनाभरापासून मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. गत काही दिवसात तर मृत्यूची नाेंद झाली नाही. मात्र आतापर्यंत ११२९ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ५१७, माेहाडी ९८, तुमसर १२९, पवनी ११२, लाखनी ९९, साकाेली १०५, लाखांदूर ६९ व्यक्तींचा समावेश आहे.