उपचार कीट, ५० स्ट्रेचर भेट : अपघातग्रस्तांना मिळेल तातडीची मदत
लाखनी : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नाही. यासाठी त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी हायवे मृत्युंजय दूत योजना अस्तित्वात आणली आहे. मात्र, महामार्ग पोलिसांकडे साधन उपलब्ध नसल्याने मदत देताना अडचण निर्माण होत होत्या. ती अडचण लक्षात घेऊन वरठी येथील सनफ्लॅग कंपनीने राष्ट्रीय महामार्ग पोलिसांना मदतीचा हात दिला. यातून त्यांनी १०० उपचार किट आणि ५० स्ट्रेचर दिले आहे.
सनफ्लॅग कंपनीमध्ये पार पडलेल्या छोटेखानी समारंभात हे सर्व साहित्य महामार्ग पोलीस पथकाच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी सनफ्लॅग कंपनीचे डायरेक्टर ऑफ टेक्निकल रामचंद्र दळवी, एचआर असोसिएशन प्रमुख सतीश श्रीवास्तव, सुरक्षा अधिकारी जवाहरलाल गुप्ता, एचआर व्यवस्थापक समीर पटेल, महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, पोलीस उपअधीक्षक संजय पांडे, पोलीस निरीक्षक वैशाली वैरागडे, गडेगाव महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अमित कुमार पांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून राज्यात महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मृत्युंजय दूत संकल्पना अस्तित्वात आणली आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने जर कुठे राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास त्या अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळावा, हा या मागील उद्देश आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी ही नवसंकल्पना अस्तित्वात आणली असून त्याचा अनेकांना लाभ मिळाला आहे.
महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेची माहिती गडेगाव मदत केंद्राचे प्रभारी अमितकुमार पांडे यांनी वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या वरिष्ठांना दिली. या सामाजिक उपक्रमात सनफ्लॅग कंपनीने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने कंपनीने १०० प्राथमिक उपचार केले व ५० स्ट्रेचर महामार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
कोट
अपघातग्रस्तांना मिळेल तातडीची मदत
अपघातविरहित प्रवास व्हावा, यासाठी पोलीस महासंचालक उपाध्याय यांनी चांगली योजना अस्तित्वात आणली आहे. बेजबाबदारपणे वाहन चालवून जर अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, यासाठी मृत्युंजय दूत तयार करण्यात आले आहेत. सनफ्लॅग कंपनीने केलेल्या मदतीमुळे अपघातग्रस्तांना मदत देणे आता सोयीचे झाले आहे.
- श्वेता खेडकर, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, प्रादेशिक विभाग, नागपूर