शिक्षकांमध्ये असंतोष : मुख्याध्यापक संघाची भूमिका
२५ लोक ३८ के
भंडारा : वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) शिक्षण विभाग भंडारा येथील अधीक्षक यांच्या मनमर्जी कामामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. त्या आता इथे नकोतच अशी भूमिका भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली आहे. भंडारा येथील श्री गणेश हायस्कूलमध्ये भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाची सभा पार पडली. त्यात तो निर्णय घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी रेखा भेंडारकर होत्या. विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, सचिव राजू बांते यांची मंचावर उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी, राज्य मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष दीपक दोंदल, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी अविनाश डोमळे व तिरुपती विद्यालय मुंडीपार येथील विद्यालयातील प्राध्यापक बहेकार यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षक जाणीवपूर्वक नियमित वेतन बिल उशिरा तपासणे, शुल्लक त्रुट्या काढणे, विविध प्रकारचे देयक प्रलंबित ठेवणे आदी बाबींमुळे जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. आता त्यांना इथून हटवले पाहिजे, अशी भूमिका मुख्याध्यापक संघाने घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्याध्यापक संघाकडून निवेदन दिली गेली. त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक, नागपूर हा प्रकार का खपवून घेत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता आर-पार अधीक्षक हटाव ही लढाई लढली जाणार आहे. विदर्भ मुख्याध्यापक संघाची सभा पवनी येथे ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार आहे. विदर्भ मुख्याध्यापक संघाची निवडणूक डिसेंबरअखेर होणार असल्याचे संकेत कार्याध्यक्ष अशोक पारधी यांनी दिले. झालेल्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या सभेला अर्चना बावणे, सुनीता तोडकर, कुंदा गोडबोले, प्रदीप मुटकुरे, मनोहर मेश्राम, अनमोल देशंपाडे, सुनील घोल्लर, मनोहर कापगते, विलास जगनाडे, राजू भोयर, अतुल बारई, जी. एन. टीचकुले, सुरेश खोब्रागडे, वीपीन रायपुरकर, गोपाल बुरडे, एस. डी. आरीकर आदी उपस्थित होते. संचालन व आभार राजू बांते यांनी केले.
बॉक्स
अपघाती लाभ द्या
भंडारा जिल्ह्यातील शाळांच्या कर्मचाऱ्यांचा भंडारा जिल्हा डिस्ट्रिक्ट को-ऑप. बँक मुख्यालय भंडारा यांनी अपघाती विमा काढला असेल-नसेल तरीही अपघातात मृत्यू झालेले प्राध्यापक बहेकार यांना २५ लाख विमा रक्कम तत्काळ देण्याची मागणी करण्यात आली. भंडारा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक यांची भेट घेऊन अपघात विमाबाबत काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी भेट घेतली जाणार आहे.
250921\img_20210925_145502.jpg
वेतन पथकाच्या अधिक्षका आता नकोतच
शिक्षकां मध्ये असंतोष: मुख्याध्यापक संघाची भूमिका