भुयार : प्राधान्य कुटुंब या योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या १९ महिन्यांपासून अन्नधान्य मिळालेले नाही. त्यांना तत्काळ अन्नधान्याचा पुरवठा करा, या मागणीला घेऊन भारतीय जनता पार्टी पवनी तालुका व शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले.
पवनी तहसील अंतर्गत ज्यांनी राशनकार्ड खुळवा करण्यासाठी अर्ज केले त्यांना त्या निकषानुसार राशन कार्ड वेगळे करून दिले. पटवारी उत्पन्न दाखला ४५ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना प्राधान्य कुटुंब योजनेतील समाविष्ट केले. परंतु आज पावतो १९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अशा कुटुंबीयांना एकही किलो अन्नधान्य मिळालेले नाही. केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा महाभयंकर महामारी कोरोना काळात प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट राशनकार्ड धारकांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. पवनी तालुक्यातील प्राधान्य कुटुंब योजनेतील समाविष्ट राशन कार्डधारक लाभार्थ्यांवर अन्यधान्य न मिळाल्यामुळे अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे.
लाभार्थ्यांना तत्काळ अन्नधान्य द्यावे, जोपर्यंत प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशा प्रकारचे निवेदन भारतीय जनता पार्टी पवनी तालुका व शहराच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारामार्फत तहसीलदार पवनी यांना देण्यात आले. यावेळी मोहन सुरकर, प्रकाश कुर्झेकर, हिरालाल वैद्य, अनुराधा बुराडे नगरसेविका,निर्मला तलमले नगरसेविका, मच्छिंद्र हटवार, संदीप नंदरधने, सुरेश अवसरे, डाॅ. सुनील जीवनतारे, रामू गजबे, प्रमोद मेश्राम सर, कविता कुळमते, मयूर रेवतकर,हरीश बुराडे,यादव सोमनाथे आदी उपस्थित होते.