गावाला बेटाचे स्वरुप : ७५ टक्के गावात आदिवासींचे वास्तव्यचिचाळ : पवनी तालुक्यातील सुरबोडी पुनर्वसनाचा प्रश्न सन २०१२ पासून शासन दरबारी रखडलेला आहे. पावसाळ्यात वैनगंगेला येणाऱ्या पुरामुळे व धरणाचे पाणी अडविल्याने संपूर्ण सूरबोडीला बेटाचे स्वरुप येते. पुनर्वसन झाले नसल्याने धरणाच्या पाण्यामुळे विविध आजाराची लागण होऊन गाव वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाचे अधिकारी दरवर्षी गावाला भेट देवून मुल्यांकन करतात. मात्र, त्यानंतर कारवाई शुन्य आहे. मात्र पाणी कुठे मुरते हे अद्यापही न समजणारे कोडे आहे. पुनर्वसनाची कोणतीच प्रक्रिया दिसून येत नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे.पवनी तालुक्यापासून ३१ कि.मी. अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या गट ग्रामपंचायत सौंदड मध्ये समाविष्ट आहे. या ग्रामपंचायतमध्ये सुरबोडी, खापरी या गावाचा समावेश आहे. सौंदड व खापरी या गावाचे चकारा येथे पुनर्वसन झाले आहे.मात्र सुरबोडी हे एकटेच गाव नदीशेजारी राहिले आहे. सुरबोडी गाव हे गोसे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. या गावाची ३६४ लोकसंख्या व ९० कुटुंब आहेत. ६७ शेतकरी व २३ भूमिहीन कुटुंब आहेत. गावामध्ये ७५ टक्के आदिवासी, गोंड, ढिवर, माळी, लोहार समाजाचे वास्तव्य आहे.गावातील ४१.५३ शेती आहे. यापैकी ३८.४० हेक्टर आर शेतजमीन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आली आहे. ९२.४६ टक्के असून ७५ टक्के पेक्षा अधिक आहे. उर्वरीत ४६.७६ हेक्टर आर शेतजमीन मौजा सौंदड खापरी चकारा येथील शेतकऱ्यांची आहे.गोसेखुर्द पुनर्वसन विभाग आंबाडी सुरबोडी फेरसर्व्हेक्षण नुसार गावाचे उत्तरेकडील बाजूला धरणाचे बुडीत क्षेत्राचे पाणी ५० मिटरपर्यंत येईल. पूर्वेस १२५ मी. अंतर पर्यंत व पश्चिमेस ३५० मि. अंतरावर येणार असल्याचे नमूद आहे. गावाच्या दक्षिणेस झुडपी जंगल आहे. सध्या धरणाचे पाणी १.५०० कि.मी. अंतरावर आहे.शासनाने धरणाचे पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने शासनाच्या मुल्यांकनानुसार केव्हाही पाणी गावाला वेढा घेण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे अथांग पाणी भूअंतर्गत पाण्यात झिरपून गावातील पाण्याचे स्त्रोत विहिरी, कुपनलिका दूषित होऊन आरोग्याला, चर्मरोग, पोटाचे विकार, दमा, खासी, डेंग्यू, कावीळ निर्माण होण्याची शक्यता आहे. गावाच्या चारही बाजंूनी दलदलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डास व किटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग, साथीचे रोग या सोबतच वन्यप्राण्यांचा धोका संभवत आहे. धरणाच्या जलाशयासाठी शेतजमीन बाधीत झाल्याने रोजगाराचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. यामुळे गावातील लोकांना भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सूरबोडी गावाचे पुनर्वसन करून पुनर्वसन अनुदान, घरबांधणी अनुदान, नोकरी ऐवजी मिळणारी एकमुस्त रकमेसह मिळणारे सर्व लाभ द्यावे, धरणाच्या जलाशयात व मासेमारीचा कायमस्वरुपी लाभ द्यावा, आदी समस्यांचे निवेदन विभागीय आयुक्त पुनर्वसन नागपूर, आमदार रामचंद्र अवसरे व जिल्हाधिकारी भंडारा यांना ग्रामस्थांनी दिला आहे. गावाला पूनर्वसन योजनेंतर्गत लाभ देऊन ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी या निवेदनातून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. (वार्ताहर)
सुरबोडी पुनर्वसानाचा प्रश्न अधांतरी
By admin | Published: January 19, 2017 12:25 AM