भंडारा/ मंडणगड : येथील वेळास गावात बुधवार पहाटे वेळास येथे विहिरीत पडलेल्या रानडुकराला ग्रामस्थांनी वनविभाग व पोलिसांच्या मदतीने जीवदान दिले. वनविभागाच्या पिंजऱ्यात पकडण्यात आलेले रानडुक्कर साखरी येथील जंगलात सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक गावकरी आणि वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने या रानडुक्कराचा जीव वाचला.
वेळास येथील ग्रामस्थ हेरंब दांडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दांडेकर व दीपक वैद्य यांच्या सामायिक विहिरीत बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमार रानडुक्कर पडलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी गावातील अन्य ग्रामस्थ तसेच वनविभाग व पोलीस खात्याला याबाबत माहिती दिली. यानंतर डुकरास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी दापोली वनविभागातून पिंजरा आणण्यात आला. वनरक्षक एस.आर. गायकवाड, ए.आऱ. मंत्रे, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे ए. एस. आय. श्री. आळे, वनरक्षक ए. बी. पाटील, सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या पिंजरा दोरीच्या मदतीने विहीरीत सोडण्यात आला. त्यानंतर पाण्यात पोहत असलेले रानडुक्कर काही क्षणात या पिजऱ्यात शिरले. यानंतर पिंजरा विहिरीतून वर काढण्यात आला. डुक्कर पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याने घटनास्थळी जमलेल्या सर्वानीची सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर पिंजरा गाडीत भरुन तो साखरी येथील जंगलात नेण्यात आला, तेथे रानडुक्कराला सोडून देण्यात आले.