गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून मध्यरात्री घराबाहेर बोलावून एका ४५ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्टच्या मध्यरात्री लाखांदूर तालुक्यातील चिचोली/अंतरगाव या गावात घडली.
जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव बेनीराम बळीराम रहिले (४५) असे असून तो गंभीत जखमी झाला आहे. त्याला नागरिकांनी रात्रीच लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी चिंचोली येथील अरविंद दादाजी तुमन्ने (२८), गुलाब नंदलाल तरंडे (३०) व संतोष केवळराम तुमन्ने (४०) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या रात्री बेनीराम रात्रीच्या स्वतःच्या घरी कुटुंबीयांसह झोपला होता. दरम्यान, गुलाब तरंडे बेनीरामच्या घरी पोहोचत खासगी कामाच्या बहाणा करून बेनीरामला घराबाहेर बोलविले.
तथापि, आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास आवाज देताच घराबाहेर पडलेल्या बेनीरामवर आरोपीने जादूटोणा केल्याचा आरोप करीत मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी पीडित व्यक्तीच्या घरालगत उपस्थित असलेल्या अन्य दोन व्यक्तींनी देखील बेनीरामला मारपीट केल्याचा आरोप केला आहे.
बेनिराम राहिले यांच्या तक्रारीवरून तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी तिन्ही आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लोकेश वासनिक तपास करीत आहेत.