शिक्षकांचे धरणे आंदोलन: चार आमदारांची उपस्थितीभंडारा : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाला मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेंद्र निंबाळकर यांनी अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार आमदारांसह १८ शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.दुपारी २.३० वाजता धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार ना. गो. गाणार, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, शिक्षण मंडळाचे डॉ.उल्हास फडके यांच्यासह १८ शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षक संघटनांच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे अनेक प्रकरणे जिल्हा परिषदेत प्रलंबित आहेत. या प्रकरणाबाबत काय कारवाई झाली? याची चर्चा करण्यासाठी शिक्षकांचे शिष्टमंडळ सोमवारला दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या कक्षात गेले होते. चर्चा सुरू असताना निंबाळकर संतप्त झाले व शिक्षकांना वाटेल तशा शब्दात बोलू लागले. शिक्षकांना अश्लिल शिवीगाळ करून दालनाबाहेर हाकलून लावले. या प्रकरणामुळे शिक्षकांनी निषेध व्यक्त केला. निंबाळकर यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करण्यात येऊन शिक्षकांचा सन्मान जपला जावा, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली. त्यानंतर सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी धीरजकुमार व पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन त्यांना सोपविले. या आंदोलनात अंगेश बेहलपाडे, यादवकांत ढवळे, ईश्वर नाकाडे, राजेंद्र दोनाडकर, मार्तंडराव गायधने, हरीकिशन अंबादे, मुबारक सैयद, धनंजय बिरणवार, रमेश सिंगनजुडे, अशोक वैद्य, राजेश धुर्वे, युवराज खोब्रागडे, युवराज वंजारी, जयंत उपाध्ये, वसंत साठवणे, अमोल गजभिये, श्रीधर काकीरवार, अशोक कापगते, मनिषा काशिवार, दिशा गद्रे, अशोक रंगारी, महादेव साटोणे, यादवराव गायकवाड, शशांक चोपकर यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)
सीईओंना निलंबित करुन गुन्हा दाखल करा
By admin | Published: May 06, 2016 12:31 AM