शिक्षक संघटनांची मागणी : प्रकरण शिक्षकांना अश्लील शिवीगाळचे, आज निदर्शने भंडारा : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाला मुख्य कार्यपालन अधिकारी (सीईओ) राजेंद्र निंबाळकर यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून शिक्षकांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. याप्रकरणी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. या मागणीसाठी उद्या ५ रोजी निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे अनेक प्रकरणे जिल्हा परिषदेत प्रलंबित आहेत. या प्रकरणाबाबत काय कारवाई झाली? याची चर्चा करण्यासाठी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ सोमवारी दुपारी मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या दालनात गेले होते. चर्चा सुरू असताना राजेंद्र निंबाळकर अचानक संतप्त झाले व शिक्षकांना वाटेल तसे बोलू लागले. शिक्षकांना अक्षरश: अश्लील शिवीगाळ केली व दालनाबाहेर हाकलून लावले. विशेष म्हणजे काही शिक्षकांनी या सर्व प्रकरणाची मोबाईल रेकॉर्डिंग केली होती. ती रेकॉर्डिंग रात्रभरात वायरल झाली आणि संपूर्ण राज्यात पसरली. जिल्ह्याचे नेतृत्व करीत असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्याचे असे वर्तन योग्य नसल्याने तसेच असे प्रकार वारंवार घडत असल्याने मंगळवारी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन केले. राजेंद्र निंबाळकर यांची तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या मागणीसाठी ५ मे रोजी २ ते ५ वाजताच्या कालावधीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक संघटना शिक्षकांना सोबत घेऊन निषेध व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मागणीची पुतर्ता न झाल्यास १२ मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे विभागिय अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, अंगेश बेहलपाडे यांनी सांगितले. ५ रोजी आयोजित आंदोलनात शिक्षकांच्या विविध संघटना सहभागी होणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निलंबित करा
By admin | Published: May 05, 2016 12:55 AM