भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल घाेषित हाेऊन आता एक महिना झाला तरी अद्यापही सत्ता स्थापनेबाबत प्रतीक्षा कायम असून, निवडणूक आयोगानेही अधिसूचना जारी केली नाही. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन हाेणार की अपक्षांना साेबत घेऊन सत्तेचे नवीन समीकरण तयार हाेणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य अस्वस्थ दिसत आहेत.
भंडारा जिल्हा परिषदेची दाेन टप्प्यात निवडणूक झाली. १९ जानेवारी राेजी निवडणुकीचा निकाल घाेषित झाला. यात सर्वाधिक काँग्रेसला २१ जागांवर विजय मिळविता आला. तर राष्ट्रवादी काँग्रेस १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १ आणि अपक्षांनी ४ जागांवर विजय मिळविला. मतदारांनी कुणाही एका पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेची कसरत नेत्यांना करावी लागत आहे. परंतु निवडणूक निकालापासून नेत्यांनी धारण केलेले माैन अद्यापही कायम आहे.
निवडणूक निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी झाला आहे. या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने आपल्या गटनेत्यांची निवड केली. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेबाबत अधिसूचना जारी झाली नाही. त्यामुळे सर्वांनाच निवडणूक आयाेगाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. सत्ता स्थापनेला विलंब हाेत असताना दरराेज नवनवीन समीकरणाची चर्चा हाेत आहे.
सर्वाधिक जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. काँग्रेसचा नैसर्गिक मित्र राष्ट्रवादीसाेबत आघाडी हाेईल, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे २१ आणि राष्ट्रवादीचे १३ असे ३४ सदस्य हाेऊन स्पष्ट बहुमत हाेते. परंतु अद्याप याबाबत वरिष्ठ नेत्यांनी काेणताही निर्णय घेतला नाही. दुसरीकडे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन अपक्षांना साेबत घेऊन १६ जणांचा गट स्थापन केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी भाजपला तर साेबत घेणार नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी वरिष्ठ कुणाचे नाव पुढे करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, तुर्तास दररोज नवनवीन नावांची भर पडत आहे. एकंदरीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
पंचायत समिती सभापतीच्या निवडीची उत्सुकता
जिल्हा परिषदेसाेबतच जिल्ह्यातील पाच पंचायत समितीची निवडणूक झाली हाेती. या निवडणुकीचा निकालही १९ जानेवारी राेजी घाेषित झाला. मात्र तेथेही अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली दिसत नाही. नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीनंतर पंचायत समितीच्या सभापती निवडीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र अधिसूचना कधी निघणार, हे मात्र अद्याप कळायला मार्ग नाही.