लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भांडण तंटे, शेतीचे वाद, चोरीचे प्रकरण अल्पवयीन मुलांचे अपहरण, लैंगिक शोषणाचे प्रकरण असे गुन्हे नोंदविण्यासाठी ग्रामसभांना पोलीस ठाणे गाठावे लागते. शासनाने गावागावात म. गांधी तंटामुक्त समित्यांची स्थापना केलेली आहे. गावातील तंटामुक्त समिती सक्षम असावी तरच गुन्ह्याचे प्रमाण कमी होवू शकते असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांनी केले.फिरते पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत शिवनाळा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. योग्य पद्धतीने समजूत काढल्यास कित्येक प्रकरणांचा निपटारा गावात होवू शकतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनाळा ग्रामपंचायतच्या सरपंच सुषमा सावरबांधे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पारधी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ब्रम्हदास बागडे उपस्थित होते.प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी फिरते पोलीस स्टेशन योजनेची माहिती दिली व गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरूकपणे कार्य करावे असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी युवकांनी मोबाईलचा वापर योग्य कामासाठी करावा. इंटरनेटच्या माध्यमातून सामान्य ज्ञान वाढण्याऐवजी अपप्रवृत्ती वाढत आहे. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवावर विश्वास ठेवून गावात तणाव निर्माण करू नये असे आवाहन केले. ब्रम्हदास बागडे यांनी अल्पवयीन मुलामुलींच्या घरून पळून जाण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी सावध राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात सरपंच सुषमा सावरबांधे यांनी गावातील युवकांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रबोधनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सेवानिवृत्त शिक्षक वामन इटाणकर यांनी आभार मानले. यावेळी उपसरपंच सुरेश सावरबांधे, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार सावरबांधे, चंदन देशमुख, विलास देशमुख, पोलीस पाटील श्रीधर सावरबांधे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंटामुक्त समिती सक्षम असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:07 AM
भांडण तंटे, शेतीचे वाद, चोरीचे प्रकरण अल्पवयीन मुलांचे अपहरण, लैंगिक शोषणाचे प्रकरण असे गुन्हे नोंदविण्यासाठी ग्रामसभांना पोलीस ठाणे गाठावे लागते. शासनाने गावागावात म. गांधी तंटामुक्त समित्यांची स्थापना केलेली आहे.
ठळक मुद्देप्रभाकर तिक्कस : शिवनाळा येथे फिरते पोलीस ठाणे