तहसीलदारांचे आवाहन : दोन दिवसात मिळणार परवानगी लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तलावातील गाळ काढून तलाव खोल करणे व तलावाची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाने गाळमुक्त तलाव व गाळमुक्त शिवार ही अभिनव योजना अमलात आणली. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन साकोली येथे नव्याने रूजू झालेले तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले.भंडारा व गोंदिया जिल्हा तलावांचा व भाताचे जिल्हे म्हणून नावलौकीकाला आहेत. या दोन्ही जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वीच्या काळी या तलावातील पाण्याने हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होत होती. कालांतराने तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात साचली.त्याचा उपसाच करण्यात आला नाही. त्यामुळे या तलावाची सिंचन क्षमता कमी झाली. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही तलावात वर्षभर पुरेल एवढे पाणी साचत नाही. त्यामुळे सिंचनासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही अडचण निर्माण होते. वर्षानुवर्षे शेतात पिक घेतल्याने व रासायनिक खतांचा वारंवार उपयोग केल्याने जमिनीची पोत घसरली आहे. त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीत तलावाची गाळ टाकणे पर्यायी सोय होऊ शकते. यासाठी शासनातर्फे गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही योजना अस्तित्वात आणली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी किंवा तहसीलदार यांना अर्ज सादर करावयाचा आहे. परवानगी मिळताच ट्रॅक्टर किंवा इतर वाहनाच्या सहाय्याने स्व:खर्चाने तलावातील गाळ आपल्या शेतात टाकायचे आहे. यासाठी कुठलाही खर्च तहसील विभागात भरायचा नाही. शेतकऱ्यांनी गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार हिंगे यांनी केले आहे.
गाळमुक्त तलाव योजनेचा लाभ घ्या
By admin | Published: June 01, 2017 12:33 AM