विजय रहांगडाले : शासनाच्या धडक योजनांची दिली माहिती तिरोडा : महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने धडक मोहिमेंतर्गत सिंचन विहीर योजना शेतकऱ्यांकरिता अस्तित्वात आणलेली आहे. शेतकऱ्यांनी सदर शासकीय योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्याचे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.बेरडीपार येथील नाटकाच्या उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, रमणीक सयाम, सरपंच सरिता राणे, उपसरपंच रमेश साठवणे, सदस्य मिलिंद कुंभरे, जितेंद्र रहांगडाले, पासपोर्ट एजंट राज सोनेवाने, कैलास कटरे, डिलेश पारधी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, या योजनेमुळे टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्याकरिता शेतकऱ्यांना मदत होईल. ही योजना गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. तसेच या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देण्याकरिता कोणत्याही अधिकारी अथवा कार्यालयाशी संपर्क न करता सरळ आॅनलाईन अर्ज शेतकरी करू शकतात. यासाठी शेतीचा सातबारा, नकाशा, नमुना आठ-अ, बँक पासबूक झेराक्स व अर्ज या कागदपत्रांची पूर्तता करुन कोणत्याही इंटरनेट कॅफेमधून महाआॅनलाईन सेंटर येथे जाऊन आॅनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्यासाठी वेबसाईटचा वापर करावा. तसेच ज्यांना आॅनलाईन अर्ज करताना कोणत्याही अडचणी येत असल्यास आ. रहांगडाले जनसंपर्क कार्यालयात आॅनलाईन अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर जमीन असून कमाल मर्यादेकरिता कोणतीच अट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा त्वरित लाभ घेण्याचे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले. संचालन पी.आर. कटरे यांनी केले. आभार पारधीकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी )
सिंचन विहीर योजनेचा लाभ घ्या
By admin | Published: November 15, 2016 12:33 AM