भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सध्या रुग्णसंख्या वेगाने घटत असली तरी धोका मात्र कायम आहे. २७ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र एप्रिल महिन्याने सर्वांना भयभीत करून टाकले होते. या महिन्यात सुमारे ३३ हजारांवर व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार १७६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. विविध कामांच्या निमित्ताने घराबाहेर पडावेच लागते. कामधंदा शोधताना कुठे ना कुठे संपर्क येतो आणि त्यातून मग कोरोनाचा संसर्ग होतो. यापेक्षाही दुसरे कारण म्हणजे अनेक जण बेफिकिरीने वागताना दिसून येतात. मास्क न घालणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, आपल्याला कोरोना होऊच शकत नाही, असा अतिआत्मविश्वास अनेक पुरुषांमध्ये दिसून येतो. याउलट महिला सर्व नियमांचे पालन करतात. अगदी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडतात. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करतात. फाजिल आत्मविश्वास बाळगत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये भंडारा जिल्ह्यात तरी कोरोनाचे प्रमाण कमी दिसून येत आहे.
वयोगटानुसार विचार केल्यास २१ ते ३० आणि ३१ ते ४० या वयोगटातच सर्वाधिक पुरुष कोरोनाबाधित असल्याचे दिसून येते. २१ ते ३० वयोगटात ६,६१३ आणि ३१ ते ४० वयोगटात ७,३४३ पुरुष पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. घरच्या कर्त्या पुरुषाला कोरोना झाल्यास कुटुंबाचे काय होते याची उदाहरणे आसपास दिसत आहेत. कोरोना उपचारासाठी झालेला अवाढव्य खर्च कुटुंबाला दहा वर्षे मागे घेऊन जातो. दुर्दैवाने कुटुंबातील कर्ता पुरुष गमावला तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर येण्याची भीती असते.
गत आठ-दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मृतांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे पुन्हा अनेक जण बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. कोरोना संपला नाही त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. खासकरून पुरुषांनी आणि त्यातही तरुणांनी कोरोनाला सहज घेऊ नये.
बाॅक्स
वयोगटानुसार कोरोनाबाधित
वयोगट पुरुष महिला एकूण पुरुष टक्केवारी महिला टक्केवारी
० ते १० ९८१ ९१९ १,९०० ५१.६२ ४८.३७
११ ते २० २,८४८ २,४३५ ५,२८३ ५३.९१ ४६.०९
२१ ते ३० ६,६१३ ५,३३५ ११,९४८ ५५.३५ ४४.६५
३१ ते४० ७,३४३ ४,९६९ १२,३१२ ५९.६४ ४०.३६
४१ ते ५० ६,२८७ ४,३१४ १०,६०१ ५९.३१ ४०.६९
५१ ते ६० ५,२९५ ३,३६८ ६,६६३ ६१.१२ ३८.८८
६१ ते ७० २,७७८ १,९७९ ४,७५७ ५८.४० ४१.६०
७१ ते ८० ८८० ५२९ १,४०९ ६२.४६ ३७.५४
८० वरील १९७ १०६ ३०३ ६५.०२ ३४.९८
एकूण ३३,२२२ २३,९५४ ५७,१७६ ५८.१० ४१.९०