लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर येथील भुरे नर्सिंग होममध्ये चुकीची शस्त्रक्रिया केल्याने देव्हाडी येथील युवतीला आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. मुलीवर नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून सुमारे २० लाखांचा खर्च केला आहे. मुलीचे पालक रमेश ईश्वरकर व आई ममता ईश्वरकर यांनी तुमसर पोलिसात तक्रार केली असून अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. यापुढे ग्राहक मंच व न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रहिवाशी रोहिणी ईश्वरकर (२४) हिला पोटात डाव्या बाजूला वेदना सुरू होत्या. त्यामुळे तिला तुमसर येथील भुरे नर्सिंग होममध्ये उपचाराकरिता दाखल केले. तिला अपेन्टीक्स असल्याचे निदान करून शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर रोहिनीची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु पोटाच्या वेदना कमी न होता वाढत गेल्या.येथील डॉक्टरांनी नागपूर येथे आदित्य हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले. तिथे पुन्हा तपासण्या करण्यात आल्या. येथील डॉक्टरांनी सांगितले की, तुमसरला शस्त्रक्रिया केली त्यात मुलीच्या पोटातील आतडीला छिद्र पडले असून पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगून १७ दिवस रुग्णालयात ठेवले.उपचाराचा खर्च १५ लाख घेतला. त्यानंतरही आजार कमी झाला नाही. पुन्हा मुलीला लता मंगेशकर हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. तिथे सध्या उपचार सुरू आहे. आतापावेतो उपचारावर २० लाखांचा खर्च झाला आहे.मुलीची आई ममता ईश्वरकर यांनी भुरे नर्सिंग होम विरोधात तुमसर पोलिसात तक्रार दिली असून संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे.रोहिनी ईश्वरकर हिला अपेन्डीक्सचा त्रास होता. त्याकरिता शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मात्र मुलीला डेंग्युचे लक्षण दिसत असल्यामुळे तिला नागपूरला पाठविले. भुरे नर्सिंग होण्यामध्ये शस्त्रक्रिया डॉ. अतुल डोकरीमारे यांनी केली होती, असे वक्तव्य डॉ. मिनल भुरे यांनी केले आहे.रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले मुलीचे पालक अतिशय हताश झाले असून कर्ज घेऊन मुलीचा उपचार करीत आहेत.रेल्वे प्रशासनाने उपचाराकरिता आर्थिक मदत केली. संबंधित डॉक्टरविरोधात जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करणार असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी मुलीची आई ममता व वडील रमेश ईश्वरकर यांनी केली आहे.रोहिनी ईश्वरकर हिच्या पालकांची तक्रार पोलिसांकडे आली असून सध्या चौकशी सुरू आहे. जिल्हा शल्य चिकित्सकाकडे अहवाल पाठविणार असून त्यांच्या अहवालानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर.
‘त्या’ डॉक्टरवर फौजदारी कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:07 PM
तुमसर येथील भुरे नर्सिंग होममध्ये चुकीची शस्त्रक्रिया केल्याने देव्हाडी येथील युवतीला आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देईश्वरकर दाम्पत्याचा टाहो : ग्राहक मंच तथा न्यायालयीन लढाई लढणार