लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बेरारी जातीच्या शेळ्या गावातील पशुपालकांना फायद्याचे असतानाही बाहेरील प्रदेशाच्या शेळ्यांना विविध क्षेत्रात संगोपणासाठी शिफारशी करण्यात आल्या, परीणामी स्थानिक परिसरात वाढणाऱ्या शेळ्यांचे संगोपण झाले नाही. पूर्व विदर्भात बेरारी शेळीच्या प्रसारासाठी शास्त्रज्ञ व पशू संवर्धन विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. डी. के. सडाना यांनी केले.ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा व नाबार्ड पुरस्कृत आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत बेरारी शेळी संगोपण व चिंतन मेळाव्याचे आयोजन आलेसूर, तालुका तुमसर येथे करण्यात आला. या वेळी मेळाव्याचे उद्घाटक नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी संदिप देवगिरीकर हे होते, कर्नाल येथील पशुतज्ज्ञ व वैज्ञानिक डॉ. डी. के. सडाना प्रमुख मार्गदर्शक लाभले. विषेश अतिथी भंडाराचे जिल्हा उपायुक्त जिल्हा पशूचिकित्सालय डॉ. सुरेश कुंभरे, जिल्हा परिषद भंडाराचे पशू संवर्धन अधिकारी डॉ. एन. एच. फुके, तालुका लघु पशू चिकित्सालय तुमसरचे सहाय्यक आयुक्त डॉ. अतुल डांगोरे, गुजरात कच्छ मधील सहजीवन पशू संघटनेचे प्रमुख मा. रमश भट्टी, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, नागपूरचे पशू जैवविविधतेचे जाणकार व अभ्यासक सजल कुलकर्णी, प्रविण मोटे, गौतम नितनवरे, आकाश नवघरे, आजिंक्य शहाणे आदी उपस्थित होते. तसेच आदिवासी बहुल क्षेत्रामधील स्त्री-पुरूष व युवक पशू पालक मेळाव्याला उपस्थित होते.डॉ. डी. के. सडाना म्हणाले देशातील पशूपालकांना स्थान, मान, उंचावण्याच्या प्रक्रिया प्रभावी करण्याची गरज आहे. कारण स्थानिक परिस्थितीत वाढणाऱ्या अनेक वर्षापासून परिस्थितीला मात करणारे पशूधन आजही दुर्लक्षित आहेत. ते प्रवाहाबाहेर फेकल्या जात आहे. मात्र दुर्गम भागात राहणारे पशू पालक आपल्या परिस्थितीत त्यांचे संगोपण करीत आहेत. या कायार्साठी शासन, प्रशासन व तज्ज्ञाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले तर त्यांना बळ मिळेल. मध्य भारतात बेरारी शेळी निसर्गाची मोठी देण आहे. ती काटक व सर्व गुणसंपन्न आहे. या जिल्ह्यात संगोपण सामुहीक ताकतीने उभे करण्याची गरज आहे.ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने या परीसरातील लोकांना बेरारी शेळया उपलब्ध करून दिल्या. त्यांची वाढ होण्याची गरज आहे. त्याकरीता आमच्या विभागाच्या आरोग्य सेवा, तांत्रिक सल्ला व संगोपणा संबंधीत इतर कार्य आमचे कार्यालय मदत करेल, असे जिल्हा उपायुक्त जिल्हा पशू चिकित्सालय डॉ. सुरेश कुंभरे यांनी हमी दिली. गुजरात-कच्छ प्रदेशात पशू संवर्धनाच्या पद्धती विशद केल्या. उंटाच्या दुधाला अमुल ने जी ताकद दिली त्यामुळे आज बाजारात उंटाच्या दुधाचे चॉकलेट उपलब्ध आहेत. यामुळे उंट संगोपणात मोठी मदत मिळाली आहे. बेरारी शेळीचे संघ निर्मीती करावी, त्या प्रक्रियेसाठी मदत राहील, असे मत सजल कुलकर्णी यांनी मांडले. संचालन ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे कोषाध्यक्ष पृथ्वीराज शेंडे यांनी केले. प्रास्ताविक ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांनी केले. आभार प्रदर्शन वाडी प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक जगन्नाथ कटरे यांनी केले.
बेरारी शेळीच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:25 AM
बेरारी जातीच्या शेळ्या गावातील पशुपालकांना फायद्याचे असतानाही बाहेरील प्रदेशाच्या शेळ्यांना विविध क्षेत्रात संगोपणासाठी शिफारशी करण्यात आल्या, परीणामी स्थानिक परिसरात वाढणाऱ्या शेळ्यांचे संगोपण झाले नाही.
ठळक मुद्देसडाना यांचे प्रतिपादन : आलेसूर येथे शेळी संगोपन व चिंतन मेळावा