दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी, डॉ. माधुरी माथूरकर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
फवारणी प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणा, सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना दिले. आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डेंग्यू आजाराबाबत प्रशासनासोबतच नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करताना, कोविडच्या विषाणू प्रतिबंधासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजना सुरू असताना भंडारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यू तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप हा एक विषाणूजन्य आजार आहे. इडीस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. हा आजार दोन प्रकारे होऊ शकतो. यामध्ये डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) डेंग्यू तापाच्या रुग्णाला उपचारासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
डेंग्यू ताप लहान मुलांमध्येसुद्धा आढळून आला आहे. डोके व डोळे दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा तसेच तीव्र स्वरूपाची अंगदुखी ही डेंग्यूची लक्षणे आहेत. डेंग्यू हा गंभीर स्वरूपाचा आजार मादी डासाच्या चावण्याद्वारे पसरतो. या डासांना आळा घालणे या एकमेव उपायामुळे डेंग्यूचा प्रसार थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, साठलेले पाणी वेळच्या वेळी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. पावसाचे पाणी घराच्या आवारात अथवा परिसरात कुठेही थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच यासाठी आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. घरातील व्यक्तीला ताप आल्यास व लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. नगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग हे डेंग्यूच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. जनतेने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. या बैठकीत लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला आहे.