त्यांनी कारखाना गेटसमोर कामबंद आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. त्यांच्या समस्या व कारखाना व्यवस्थापनाकडून दिली जाणारी गैरवागणूक समजून घेतली. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
काही दिवसांपूर्वी देव्हाडा बुज येथील मानस ॲग्रो कारखान्यातील कामगारांनी एकजुटीने कारखाना व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत न्याय्य हक्कासाठी विचारणा केली होती. परंतु कारखाना व्यवस्थापनाकडून सहा कामगारांवर अधिकाऱ्यांना धमकाविल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई दोषपूर्ण आहे व कामगारांच्या मौलिक अधिकारांचे हनन करणारी आहे. कामगारांचे दोन महिन्यांचे थकित वेतन वारंवार मागणी करूनही देण्यात आले नाही. मासिक पगार देण्याची ठराविक तारीख ठरविण्यात आलेली नाही. पीएफचे कामगारांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले पैसे संबंधित विभागात भरण्यात आलेले नाहीत. या संबंधीचा शाब्दिक जाब कामगारांनी विचारला असता, ही बाब कारखान्याची शिस्तभंग करणारी निश्चितच नाही, हे कारखाना व्यवस्थापनाने अगोदर समजून घेण्याची गरज आहे. कामगारांनी आपल्या हक्काची मागणी केली, तर बिघडले कुठे, असा प्रश्न शिवसेना तालुकाप्रमुखांनी यावेळी उपस्थित केला.
कामगारांची लढाई आपल्या न्याय्य हक्क व अधिकारासाठी असल्यामुळे कारखाना प्रशासनाने कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. कारखाना व्यवस्थापनाने चुकीचा ठपका ठेवून निलंबित केलेल्या कामगारांना आठ दिवसांत पूर्ववत कामावर घेऊन वाद संपवावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा मोहाडी तालुका शिवसेनाप्रमुख अनिल सार्वे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.
कामगारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा
निलंबित सहा कामगारांना लवकरच कामावर न घेतल्यास शांततेचा व शिस्तीचा परिचय म्हणून सामूहिक राजीनामे देणार असल्याचे कामगारांनी कळविले आहे. कारखाना व्यवस्थापनाने याप्रकरणी गांभीर्य दाखविण्याची अपेक्षाही कामगारांनी व्यक्त केली आहे.