लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन वर्षापूर्वी वैनगंगेला आलेल्या महापुराने सर्वत्र हाहाकार उडाला होता. कोट्यवधी रुपयांचे नुकसान या महापुराने झाले होते. या महापुरातून धडा घेत जिल्हा प्रशासन यावेळी २४ तास अलर्ट होते. अतिवृष्टी होऊनही जिल्ह्यात कुठेही मोठे नुकसान झाले नाही. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणेच्या सतत संपर्कात राहून सूचना दिल्याने पूरपरिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला यश आले.जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स विसर्ग सुरू झाल्याने पूरपरिस्थितीची शक्यता निर्माण झाली. नियोजनबद्ध उपाययोजना करून प्रशासनाने परिस्थितीवर मात केली.
गावागावांत होमगार्ड तैनात- भंडारा जिल्ह्यात नदीतीरावर सुमारे १३० गावे आहेत. या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करता याव्या म्हणून गावागावांत होमगार्ड तैनात करण्यात आले. तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठीही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले होते.
शेवटच्या घटकापर्यंत प्रशासने होते संपर्कात- धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गोसेखुर्द धरणातून दोन हजार क्युमेक्स पाणी सोडण्यात येत होते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक झूम मिटिंग घेतली. त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्यासह गोसे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व ठाणेदार उपस्थित होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या. तसेच शेवटच्या घटकापर्यंत प्रशासन संपर्कात होते.३३ गेट उघडून १२ हजार क्युमेक्सपर्यंत विसर्ग- गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. परंतु तेथील जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून प्रशासनाने ३३ गेट उघडण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून १२ हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सतत १५ दिवसापासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तासातासाने मोजणी केली पाणीपातळीभंडारा शहरानजिक वैनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ कारधा येथे पाणीपातळी मोजण्याची यंत्रणा आहे. अतिवृष्टीच्या काळात आपत्ती निवारण विभागाच्या वतीने दर तासाला येथील पाणीपातळी मोजण्यात आली. या पाणीपातळीची माहिती सोशल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली. १३ जुलैपासून कारधा येथील वैनगंगेची पाणीपातळी वाढायला लागली. २४२.८ मीटरवरुन ती २४३ मीटरपर्यंत पोहचली. येथे इशारा पातळी २४५ मीटर तर धोकापातळी २४५.५० मीटर आहे. धोकापातळी ओलांडली की सर्व जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळेच येथील पाणीपातळीवर प्रशासन लक्ष ठेवून होते.