राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : भाड्याच्या घरात असलेल्या तलाठी कार्यालयांना आता हक्काच्या इमारती मिळणार आहेत. तलाठी कार्यालयाच्या शासकीय इमारतीसाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. लवकरच मोहाडी तालुक्यात तीस तलाठी कार्यालय स्वतःच्या इमारतीत दिसून येणार आहेत.
मोहाडी तालुक्यात ३८ तलाठी कार्यालय आहेत. त्यापैकी तीस तलाठी कार्यालयाच्या शासकीय इमारती लवकरच उभ्या राहणार आहेत. त्यासाठी तलाठी कार्यालयासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. अंदाजपत्रकाची किंमत ४ कोटी ७७ लाख ९२ हजार एवढी आहे. नागपूर सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडून तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली आहे. आता प्रशासकीय मान्यता व निधीच्या उपलब्धतेची प्रतीक्षा संपली आहे. प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्याभरात तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकामाची निविदा काढली जाणार असल्याची माहिती मिळाली. तलाठी कार्यालय हक्काची असावीत, यासाठी सातत्याने आमदार राजू कारेमोरे यांनी प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा केला. लवकरच या तलाठी कार्यालयाच्या इमारती उभ्या दिसणार आहेत.
येथे होणार तलाठी कार्यालयाचे बांधकाममोहाडी तालुक्यात खुटसावरी, चिचोली, पांजरा, जांब, धुसाळा, नवेगाव, शिवनी, धोपे, सालई खुर्द, उसर्रा, सालई बुटूक, टांगा, डोंगरगाव, कुशारी, रोहा, कान्हळगाव सिर, वडेगाव, मांडेसर, नेरी, सातोना, मोहगाव देवी, दहेगाव, बेटाळा, देव्हाडा बु., मोहगाव बु., मुंढरी बु., जांभोरा, पारडी, पाचगाव, निलज बु. व खडकी या गावांमध्ये तलाठी कार्यालयाच्या नवीन दिमाखदार इमारती तयार केल्या जाणार आहेत.
भाड्याने आहेत कार्यालयतलाठी कार्यालयाच्या इमारती नव्याने तयार होणार आहेत. पण, हे सगळे तलाठी कार्यालय भाड्याच्या घरात आजही आहेत. भाड्याने दिलेल्या तलाठी कार्यालयाचे भाडे २०१५ पासून थकीत पडलेले आहेत. थकीत भाडे आधी देण्यात यावेत, अशी मागणी भाडे मालकांनी केली आहे.