बल्लारपूर : विद्यार्थी जीवनाची जडणघडण शाळेतून होते. आपल्या विद्यार्थ्यांत कष्ट करण्याची ऊर्जा आहे. त्यांना दिशा देण्याची गरज आहे. कुशाग्र बुद्धीमत्ता व प्रचंड चिकाटीने तो अभ्यासक्रमाला सामोरे जातो. त्याच्या बुद्धीला व क्रयशक्तीला चालना देण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो. भविष्याचा वेध घेताना प्रतिभावंत विद्यार्थी देशाचा आधारस्तंभ वाटतो, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय हेडाऊ यांनी केले. शनिवारी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. येथील भालेराव पब्लिक स्कूलच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी पहिल्या वर्गापासून दहावीपर्यंतच्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेव्ह. डॉ. विजय कांळे प्रिस्ट होते. प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र दिघे, संचालक चंद्रिका सामसंग, मुख्याध्यापक पी.पी. सिंग, श्रीनिवास रैना, वसंत खेडेकर, अनिल पांडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी भालेराव पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेण्याऱ्या व गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
प्रतिभावंत विद्यार्थी देशाचा आधारस्तंभ
By admin | Published: July 09, 2015 1:06 AM