मोहाडीजवळील घटना : वडील जखमी, शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तुमसर-भंडारा मार्गावरील एमआयडीसी मोहाडीजवळ दुधाच्या टँकरने बैलगाडीला जोरधार धडक दिली. यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर मृतकाचे वडील जखमी झाले. प्रमोद नामदेव मानापुरे (२५) रा. खरबी असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.एका दुध कंपनीतून दुध घेऊन जाणाऱ्या टँकर क्रमांक एम एच ३६ - ८८३ ने एमआयडीसी जवळ मानापुरे यांया बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडीचालक प्रमोद हा उसळून टँकरच्या मागील चाकात सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर बैलबंडी उलटल्याने त्याचे वडील नामदेव दयाराम मानापुरे (६५) हे गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर टँकरचालक चुन्नीलाल मोहतुरे (३१) रा. विहिरगाव याने पळण्याचा प्रयत्न केला. पंरतु त्याला बोथली येथे पकडण्यात पोलिसांना यश आले. टँकरचालकाला अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम करीत आहेत. मृतक प्रमोद मानापुर याचे दोन वर्षापुर्वीच लग्न झालेले असून त्याला एक वर्षाची मुलगी आहे. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ५० हजारांची तत्काळ मदतघटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच मागण्यांसदर्भात ठिय्या मांडला यात शिवसेनेनेही उडी घेत प्रशासनाने मृतकाच्या कुटंूबीयाला २० लक्ष रुपयांची मदत द्यावी, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भुमिका घेतली. यावेळी टँकर मालक भाऊराव तुमसरे यांनी घटनास्थळी येत मृतकाच्या कुटूंबीयाला ५० हजार रुपयांची रोख मदत दिली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी एसडीपीओ संजय जोगदंड यांनी मृतक मानापुरे यांच्या कुटुंबीयाला शासनाकडून पाच लक्ष रुपयांची मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले.
टँकरची बैलगाडीला धडक शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By admin | Published: July 17, 2017 12:23 AM