लाखनी : यावर्षीच्या हंगामात तुरीचे दर कडाडलेलेच आहे. त्यामुळे पुढीलवर्षीही डाळ महागण्याची शक्यता आहे. यावर्षी आठ हजारांवर बाजार समितीत भाव आहे. सध्यास्थितीत किरकोळ बाजारात तूर डाळ १४० ते १८० रुपये या दराने विक्री सुरू आहे. सध्या शेतात तूर पीक आहे. तूर निघण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंत हे दर कायम राहतात, की नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचा माल निघताच दर घसरतात, हे आताच सांगणे कठीण आहे. मागीलवर्षी तुरीला सरासरी ४ हजार रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. मात्र यावर्षी सध्या या दरात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी पुढीलवर्षीही तूर डाळ महागणार राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.मागीलवर्षीपेक्षा शेत मालाचे दर सरासरी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र तुरीचे दर दुप्पट झाले आहेत. तथापि सध्या शेतकऱ्यांकडे तूर नाही. विक्रीस आलेली तूर मागीलवर्षीची साठवून ठेवलेली, असावी असा कयास आहे. त्यामुळे दरवाढीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना न मिळता साठेबाजांनाच झाला असा, असा तर्क काढण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी) कारवाई नव्हे लूटचतूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. जिल्ह्यात अन्न पुरवठा विभागाने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. यासाठी पथकावर हजारो रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कारवाईत एक किलोही डाळ सापडली नाही. कारवाईच्या नावावर मात्र अधिकाऱ्यांनी स्वत:ची ‘डाळ’ शिजविली.
तूर डाळीचे दर अद्याप कडाडलेलेच
By admin | Published: November 29, 2015 1:33 AM