रविकांत देशपांडे यांचे प्रतिपादन : जलद प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांची कार्यशाळा, १,३९२ प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती भंडारा : शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तक पूर्ण करणे अपेक्षित नसून प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे. प्रत्येकाला वाचन, लेखन, संभाषण करता येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला व्यवहारातील सर्व गणितीय प्रक्रिया लिहिता व वाचता आली पाहिज, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग गणेशपूर येथील अखिल सभागृहात आयोजित कार्यशाळा प्रसंगी ते उपस्थित प्रशिणार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा सातत्यपूर्ण निरंतर व्यावसायीक संस्थेचे प्राचार्य अभयसिंह परिहार, हर्षल विभांडिक यांच्यासह मार्गदर्शकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी देशपांडे यांनी, पुरोगामी राज्यातील प्रत्येक विद्यार्थी हा पुरोगामी बनला पाहिजे. प्रत्येक मुल शिकू शकते हे सर्वांना मान्य झालेले आहे. त्यामुळे मुले शिकले की नाही हे पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक मुल १०० टक्के शिकला पाहिजे. यासाठी मुख्याध्यापकांनी अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. चांगले आयुष्य जगण्यासाठी शिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे शिकणे सुकर होण्यासाठी सर्व शाळांनी शाळासिध्दी स्वयंमुल्यमापन नोंदणी करावी. १०० टक्के शाळा डिजीटल करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.देशपातळीवर शैक्षणिक क्षेत्रात राज्य अव्वल राहण्यासाठी राज्य सरकारने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे उपक्रम हाती घेतलेले असून त्याच्या पूर्ततेसाठी शाळासिध्दी, डिजीटल शाळा, स्वच्छ सुंदर शाळा असे अनेक प्रकल्प राज्यात शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांची संयुक्त कार्यशाळा पार पडली. यावेळी हर्षल विभांडिक यांनी, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे डिजीटलायजेशन होणे गरजेचे आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी केले. तर आभार अभयसिंह परिहार यांनी केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील १ हजार ३९२ प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यशाळेला विस्तार अधिकारी अर्चना माटे यांच्यासह शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना पुस्तकांसह व्यवहारी ज्ञान शिकवा
By admin | Published: February 18, 2017 12:23 AM