११०० विद्यार्थ्यांत संभ्रावस्था : सीतासावंगी येथील प्रकार, पाच वर्षापासून मानधन नाहीतुमसर : सलग पाच वर्षापासून विवेकानंद तंत्रनिकेतनच्या प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांचे परीक्षांचे मानधन दिले नाही. त्याविरोधात महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून सुरु होणाऱ्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे नऊ लक्ष रुपये मानधनाचे थकीत आहेत. यामुळे परीक्षेसंदर्भात गोंधळाची स्थिती येथे आहे.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर यांचेकडे सीतासावंगी येथील विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांनी सन २०११ पासून हिवाळी २०१५ पर्यंतची मानधनाची रक्कम प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना प्राप्त न झाल्याविषयी तक्रार केली. या तक्रारपत्रात नमूद केले आहे की विभागीय तंत्रशिक्षण मंडळ कार्यालयाचे आदेश दिले होते. संस्थेने मानधन दस्तऐवज सादर करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी तंत्रशिक्षण मंडळाकडे मागीतला होता. प्रभारी प्राचार्य पंकज भूते यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात मानधनाचे दस्तऐवजाची पाहणी केली असता संबंधित दस्तऐवज उपलब्ध नाही असे आढळून आले. संबंधित दस्तऐवज पूर्वीचे प्राचार्य आर. एस. रोरीया यांचेकडे असावे. यापूर्वी संस्थेने सदर दस्ताऐवज संस्था अध्यक्ष किंवा संस्था सचिव यांचेकडे असावे असे पत्र दिले होते. तंत्रशिक्षण मंडळाकडून कोणत्याही पैशाची उचल केली तर लगेच संस्थेला संबंधित दस्तऐवज विभागीय कार्यालयाकडे जमा करावा लागतो. जोपर्यंत मागील दस्तऐवज मिळत नाही. तोपर्यंत पुढील बिल काढले जात नाही असा नियम आहे.सदर मानधनाचे दस्तऐवज विवेकानंद तंत्रनिकेतन, सीतासावंगी येथील कार्यालयात उपलब्ध नाही. संस्थेने विभागीय, नागपूर कार्यालयात सन २०११ पासून हिवाळी परीक्षा २०१५ पर्यंत लेखी परीक्षा व प्रात्याक्षिक परिक्षेचे मानधनाचे बिलाची रक्कम प्राप्त झाली नाही हे विभागीय मंडळ यांचेकडे कळविले होते. मंगळवारपासून तंत्रशिक्षणाच्या परीक्षा सुरु होत आहेत. सीतासावंगी येथील तंत्रशिक्षण महाविद्यालयात नियमित व बहिर्गत ११०० विद्यार्थी आहेत. संबंधित परीक्षेचा दस्तऐवज गोंदिया येथून गुरुवारी उचल करावयाचा होता. (तालुका प्रतिनिधी)
तंत्रशिक्षण प्राध्यापकांचा परीक्षेवर बहिष्कार
By admin | Published: April 09, 2016 12:22 AM