मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : शिक्षक कृती समितीचा पुढाकार भंडारा : शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या समस्या प्रलंबित असल्यामुळे शिक्षक कृती समितीतर्फे गुरूवारपासून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सहा महिन्यांपुर्वी आश्वासन देऊनही सुटलेल्या नाहीत. शिक्षणाधिकारी व वरिष्ठांना भेटूनही या समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. परिणामी विविध शिक्षक संघटना मिळून गठित करण्यात आलेल्या शिक्षक कृती समितीने १६ मार्चपासून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. परिणामी कृती समितीचे पदाधिकारी तथा सदस्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. प्रलंबित समस्यांमध्ये, वेतन १ तारखेला देण्यात यावे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक, विषय शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या कार्यशाळेचे आयोजन करून पदोन्नती द्यावी, डीसीपीएसचा हिशोब अद्ययावत करून व्याजासह रक्कम परत करण्यात यावी, सन १९९५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना सेवेत कायम केल्याचे आदेश देण्यात यावे, आंतरजिल्हा बदली प्रस्तावांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, निवड श्रेणीत व वरिष्ठ श्रेणी प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात यावी, १४ व्या वित्त आयोगानुसार सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल व ईलर्निंग करण्यासाठी निधी वळते करण्याचे आदेश खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. उपोषणात शिक्षक कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, मुबारक सैय्यद, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरनवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, वसंत साठवणे यांच्यासह विविध संघटनांचे शिक्षक सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू
By admin | Published: March 17, 2017 12:25 AM