आॅनलाईन लोकमतभंडारा : आईवडिलांच्या संस्कारात मुलांची प्रगती होते. मात्र शाळेत दाखल झाल्यानंतर शिक्षकच हे त्यांचे खरे पालक ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगसुंदर जीवन घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेला येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच पूजा ठवकर, उपसरपंच मंगला पुडके, अचल गभणे, श्रीराम भिवगडे, कन्हैयालाल नागपुरे, महेंद्र ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन गोडबोले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गाढवे, मुख्याध्यापिका सरिता निमजे, कैलाश बुद्धे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी फुके यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी राज्य सरकारने विविध महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी शिक्षकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलाने केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी असून या शाळेचा लौकीक जिल्ह्यात आहे. त्यामुळे येथील शिक्षकांनी शाळेला साजेसे असे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन त्यांची प्रगती करावी, असे प्रतिपादन केले.स्नेहसंमेलनादरम्यान विद्यार्थ्यांचे फॅन्सी ड्रेस, समूहनृत्य, इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे आर्केस्ट्रा गायन, नाटिका अशा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. बाल आनंद मेळाव्याचेही यावेळी आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले. त्या पदार्थांचा विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह नागरिकांनीही खरेदी करून त्याचा आस्वाद घेतला व विद्यार्थ्यांना ‘खरी कमाई’चे महत्व सांगितले.शाळेच्या पटांगणात वार्षिकोत्सवानिमित्त संस्कारभारतीच्या जयश्री मते यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आलेली रांगोळी सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात बौद्धीक प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्याचा विकास करण्यात आला. यावेळी प्रभाकर ठवकर, रमेश माने, सपाटे, प्रदीप काटेखाये, सरिता निमजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अनिल शहारे, लता लिचक, किरण पाटील यांनी केले तर आभार संजय उपरीकर, शुद्धोधन बोरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी जि.प. कॉन्व्हेंटच्या शिक्षिका ठवकर, गभणे, भिवगडे, अंबादे, शिक्षिका रेणुका वाडीभस्मे, रत्नमाला रहिले, उर्मिला टिचकुले, शालेय पोषण आहार कर्मचारी शांता टांगले, रत्नमाला तितीरमारे, मंजुषा टांगले, अचल मेश्राम, वेणू भगत आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.
शिक्षकांनो, बालकांचे भविष्य घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:53 PM
आईवडिलांच्या संस्कारात मुलांची प्रगती होते. मात्र शाळेत दाखल झाल्यानंतर शिक्षकच हे त्यांचे खरे पालक ठरतात.
ठळक मुद्देपरिणय फुके : बेला जिल्हा परिषद शाळेचा वार्षिकोत्सव