भंडारा : दरमहा एक तारखेला शिक्षकांचे वेतन अदा करावे, यासह अन्य मागण्या घेऊन प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अनेकदा रस्त्यावर उतरले. मात्र, केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. शासन अनुदानाअभावी शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक वेळेवर वेतन होईल किंवा नाही, या संभ्रमावस्थेत असतात.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात ७५०हून अधिक शाळा आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मिळून ३,७५०पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत. त्यातच खासगी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांचीही तशीच स्थिती आहे. दरमहा एक तारखेला वेतन मिळावे, अशी रास्त मागणी अनेकदा शिक्षक संघटनांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे केली. मात्र, जुनी पेन्शन योजना असो की वेतन एक तारखेला देण्याबाबत अनेकदा त्यांना फक्त आश्वासित करण्यात आले. परंतु, अनुदान वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पगार वेळेवर होणार तरी कसा? असा गंभीर व तेवढाच प्रासंगिक प्रश्न उपस्थित होतो. फक्त आश्वासन का दिले जाते, असा संतप्त प्रश्नही शिक्षक विचारत आहेत. याशिवाय एका विभागातून दुसऱ्या विभागात बिल प्राप्तीसाठी लागणारा वेळही अनेकदा शिक्षकांच्या आर्थिक समस्येला तोंड देणारा ठरतो. मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीपासून ते वित्त विभागापर्यंतची बिलांची देवाण-घेवाण व तिथून बँकेच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांपर्यंत जाण्याच्या बाबीलाही चांगलाच वेळ लागतो. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, याशिवाय कर्जाचे हप्ते व अन्य घटक पूर्ण करायला वेतन वेळेवर मिळत नाही. या समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
कोट
प्राथमिक शिक्षकांसह अन्य शिक्षकांचे वेतन एक तारखेला व्हावे, यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. मात्र, अनेकदा अनुदानाअभावी शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही. याचा परिणाम शिक्षकांना सोसावा लागतो.
- रमेश सिंगनजुडे, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ
कोट
वेतन वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा अनेक शिक्षकांना कर्जाचे हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च हा वेगळाच असतो. अशा प्रापंचिक स्थितीत शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे.
- ज्ञानेश्वर दमाहे, पदवीधर शिक्षक, उसर्रा, तालुका मोहाडी
कोट
शिक्षकांना गुरु म्हणून दर्जा प्राप्त आहे, मात्र शिक्षकांच्या समस्येकडे कानाडोळा केला जातो. शासन व प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आजही वेतन वेळेवर मिळत नाही. वेळेवर ग्रँट उपलब्ध करून देणे महत्त्वाची बाब आहे.
- रवी उगलमुगले, पदवीधर शिक्षक
बॉक्स
आतापर्यंत फक्त आश्वासनांची खैरात
जिल्ह्यातील शिक्षक संघटनांमार्फत विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे साकडे घालण्यात आले. मात्र, वारंवार फक्त आश्वासनांची खैरात शिक्षकांच्या पदरी पडली आहे. आठ दिवसात तर कधी पंधरा दिवसात शिक्षकांच्या समस्या मार्गी लावू, असे आश्वासन देऊन शिक्षकांच्या आंदोलनाला नमते घेण्यात आले. मात्र, आजपर्यंत शिक्षकांच्या समस्यांची कुणीही वेळेवर दखल घेतली नाही, हीच खरी शिक्षकांची शोकांतिका म्हणावी लागेल.
बॉक्स
दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होते वेतन
दरमहा एक तारखेला वेतन देण्याची घोषणा आतापर्यंत हवेतच विरली आहे. शिक्षकांचे वेतन दरमहा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तर कधीकधी शेवटच्या आठवड्यात होते. रक्कम दिली गेली आहेत, लवकरच पास होतील, या तारखेला वेतन होईल, अशी फक्त चर्चा शिक्षकांमध्ये ऐकायला मिळते. शिक्षकांच्या मानसिक त्रासाला हे जास्त कारणीभूत ठरत आहे.
एकूण शाळा ८३७
एकूण शिक्षक ३,७५०