लाखनी : जिल्ह्यातील खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे जुलै महिन्याचे वेतन शाईची प्रत कोषागार कार्यालयास वेळेवर उपलब्ध झालेली नसल्याने जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह विभागास परत करण्यात आले आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर व्हावे म्हणून प्रत्येक महिन्याला वेळेवर शाळेतून पाठविले जाते. वेतन पथकाद्वारे तपासणी करून कोषागाराकडे पाठविले जाते. परंतु संचालक पुणे यांच्याकडून वेळेवर शाईची प्रत पोस्टाने प्राप्त होत नसल्याने शिक्षकांच्या वेतनास विलंब होणे नेहमीचे झाले आहे.
शिक्षकांच्या संघटना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे यासाठी सतत पाठपुरावा करीत असते. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला व्हावे, अशी मागणी होत असते. परंतु प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे प्रत्येक महिन्याला १५ तारखेनंतर व उशिरापर्यंत वेतन बँक खात्यावर जमा होत असते. वेतन उशिरा होत असल्याने कर्मचाऱ्यांना गृहकर्ज, पगार तारण, वैयक्तिक कर्जाचे हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. एलआयसीला पैसे उशिरा पोहोचतात. इन्कम टॅक्स वेळेवर भरला जात नाही. यामुळे शिक्षक व इतर कर्मचारी यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
भंडारा जिल्ह्याचे वेतन अनुदानाच्या माहे जुलैच्या शाईची प्रत संचालक कार्यालय पुणे यांनी साध्या पोस्टाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयास १८ रोजी पाठविली. सायंकाळी ४.३० वाजता शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन पथकास पाठविली. अनुदानाच्या शाईची प्रत वेतन पथकास पाठविण्यात आली; परंतु तत्पूर्वी कोषागार कार्यालयाने बीडीएस संपल्याचे सांगून वेतन देयके परत पाठविली. त्यानंतर पगाराचे सिस्टीम अपडेट करून वेतनाची देयके पुन्हा पाठविण्यात येणार आहेत.
सध्याच्या संगणक युगात अनेक प्रशासकीय कामकाज डिजिटल स्वाक्षरीने चालते. शासन डिजिटल पद्धतीने कारभार करावा म्हणून आग्रही आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे वेतन मूळ शाईच्या प्रतीसाठी थांबविण्यात आल्याने शिक्षक संतापले आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागास प्रश्न केले तर समाधानकारक उत्तर कोणाजवळही नाही. ऑगस्ट महिना सणासुदीचा असतो. अशात वेतनास दिरंगाई होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शिक्षण संचालक पुणे तसेच वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची प्रत कोषागार कार्यालयात पाठविली जाते. यापूर्वी चार-पाच महिन्यांच्या वेतनाच्या अनुदानाची प्रत मिळायची. कोविड लाटेपासून प्रत्येक महिन्याची शाईची प्रत पाठविण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही. शिक्षणाधिकारी कार्यालय, वेतन पथक व कोषागार कार्यालय यांच्यात समन्वय नाही. यामुळे हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही.
कोट
‘शाईची प्रत’ची अट काढून टाकण्यासाठी शिक्षण आयुक्त व संचालकांना वारंवार विनंती केली आहे. मार्च २०२० पासून शाईच्या प्रतीमुळे शिक्षकांचे वेतन विलंबाने होत आहे. संपूर्ण आर्थिक वर्षाची शाईची प्रत एकदाच शासनाने देणे गरजेचे आहे. शिक्षकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे.
नागो गाणार, शिक्षक आमदार