राज्यात कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे कोरोनाची चाचणी तोडण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करून लॉकडाऊन करण्यात आले असून वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदी ही करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा तसेच संपूर्ण शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.
यात कोविड-१९अतंर्गत आपत्कालीन सेवेसाठी घेण्यात आलेले शिक्षक तसेच परीक्षा विषयक कामकाजातील शिक्षक वगळून अन्य शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या शालेय कामकाजासाठी शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात येऊ नये. परीक्षा विषयक मूल्यमापनाची सर्व कामे तसेच ऑनलाईन संबंधित कामे सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावी. तसेच या कालावधीत कोणत्याही शिक्षकास मुख्यालय सोडता येणार नाही. याबाबत आपल्या अधिनिस्त सर्व प्रकारच्या शाळांच्या मुख्यध्यापक तसेच, व्यवस्थापन मंडळांना आदेश देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी यांचे शाळा मुख्याध्यापकांना स्पष्ट आदेश नसल्याचे कारण सांगून काही मुख्याध्यापक विनाकारण शिक्षकांना शाळेत बोलावून तासनतास बसवून ठेवत होते. यात काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाली तर काही शिक्षकांना आपला जीवही गमावावा लागला. याबाबत विमाशि संघ भंडाराचे जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचेशी चर्चा करून शिक्षण उपसंचालक यांचेकडून शिक्षक उपस्थितीबाबत स्वतंत्र आदेश काढण्याबाबत चर्चा केली होती.
त्यामुळे विभागातील इतर सर्व शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक उपस्थितीबाबत स्वतंत्र आदेशही काढले. मात्र भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संकटाचे गांभीर्य नसल्यामुळे नेहमीप्रमाणे वेळ काढू धोरणाचा वापर करून अध्यापही स्वतंत्र आदेश काढले नसून आपली जबाबदारी झटकत केवळ याप्रमाणे कार्यवाही करण्याचे मोघमपणे सूचना देण्याचे शिक्षणाधिकारी यांचे जुनेच फंडे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे शाळेत उपस्थित राहण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यात संभ्रम निर्माण झाले आहे.त्यामुळे शिक्षकांना रोज शाळेत न बोलावता वर्क फ्रॉम होम ची सवलत देण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी तत्काळ आदेश काढावे, अशी मागणी विमाशिचे राजेश धुर्वे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, दारासिंग चव्हाण, धीरज बांते, पुरुषोत्तम लांजेवार, धनवीर काणेकर, अनिल कापटे, भाऊराव वंजारी, अनंत जायभाये, पंजाब राठोड, जागेश्वर मेश्राम, विनोदकुमार मेश्राम, श्याम गावळ, मनोज अंबादे यांनी केली आहे.
प्रतिक्रिया
विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे १६ एप्रिलच्या वर्क फ्रॉम होम चे स्पष्ट आदेश असताना देखील भंडारा जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश काढले नाही. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे शिक्षकांचे जीव जाण्यापूर्वी शिक्षणाधिकारी यांनी तत्काळ स्वतंत्र आदेश काढावे.
सुधाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष विमाशि संघ,भंडारा.