राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमातील बदलांपासून ते कार्यपद्धतीत बदलापर्यंतचा हा मोठाच पट आहे. यातीलच 'अपार' हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे.
तथापि, भंडारा जिल्ह्याचे अपार नोंदणीत केवळ ३५.२० टक्केच काम झाले आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. 'एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.
प्रत्येक विद्यार्थी वा विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि शिक्षणेतर प्रगतीविषयक माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित करणे आणि या डिजिलॉकरसाठी स्वतःचा स्वतंत्र असा ओळख क्रमांक असणे, हा 'अपार'चा उद्देश आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर लागणारी अधिकृत तसेच मूळ कागदपत्रे या व्यासपीठावर सहज उपलब्ध होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांची शाळा बदलल्यास त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही.
डिजिलॉकर उपलब्ध असेल. एखाद्या कंपनीला नोकरी देताना उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेची खातरजमा करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. शिक्षणासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे हरविल्यास, मात्र 'अपार' आणि पर्यायाने डिजिलॉकर असल्यास त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर कुठलाही परिणाम होणार नाही.
अशी आहे अपार नोंदणीची स्थितीजिल्ह्यातील शाळा- १,२९७ एकूण विद्यार्थी- १,९१,६३८ अपार रजिस्ट्रेशन- ६७,५७१
'अपार कार्ड' चा फायदा काय?विद्यार्थ्यांना हे कार्ड अधिक उपयुक्त ठरणार आहे. ते आधार कार्डशी जोडले जाणार आहे. यामध्ये पालकांच्या आधार क्रमांकाचाही समावेश करण्यात आला आहे. या कार्डमुळे सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
'अपार' म्हणजे काय? 'ऑटोमेटेड पर्मनण्ट अकेडमिक अकाउंट रजिस्ट्री' म्हणजे 'अपार'. हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी कायम स्वरूपी ओळख क्रमांक आहे.
नोकरीसाठीही फायदेशीर'अपार कार्ड'चा क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती समोर येते. नोकरीसाठी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही.
निवडणुकीचे काम, त्यात 'अपार' सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक शिक्षकांची मतदार केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. 'अपार'ची नोंदणी करताना शिक्षकांना अपार कष्ट करावे लागत आहे.
"विद्यार्थ्यांचे भविष्यातील हित लक्षात घेता शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अपार नोंदणीसाठी प्राधान्याने कार्य हाती घ्यावे. विद्यार्थ्यांना हे कार्ड अतिशय उपयुक्त ठरणार आहे." - रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा