देव्हाडी येथे ग्रामविकास अधिकारी बी. के. बावनकुळे गत आठ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या सेवेचा कार्यकाळ संपल्याने त्यांना ग्रामपंचायतीतर्फे सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बावनकुळे यांच्या कार्यकालाचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या कामांची प्रशंसा केली. दरम्यान, सरपंच रिता मसरके व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामविकास अधिकारी बावनकुळे यांनी केलेल्या विकासकामांत मदतीप्रसंगी उल्लेख केला. दरम्यान, सरपंच भावूक झाल्या व त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. इतर महिला ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना धीर दिला. त्यासोबतच इतर सदस्यांच्यासुद्धा डोळ्यांत अश्रू आले. काहीक्षण शांतता पसरली. या प्रसंगाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वर्मा व ठोंबरे यांनी धीर दिला.
ग्रामविकास अधिकारी बी. के. बावनकुळे यांच्या कार्यकाळात देव्हाडी येथे अनेक विकासकामे करण्यात आली. मृदु स्वभाव व कामात शिस्त असल्याने ग्रामस्थांत त्यांच्याबद्दल आदर होता. निरोप समारंभ संबोधित करताना बावनकुळे यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनात नियुक्ती व सेवानिवृत्तीही अटळ असते. त्यामुळे एकेदिवशी सेवानिवृत्तीला सामोरे जावेच लागते, असे भावनिक उदगार काढले.
या कार्यक्रमाला उपसरपंच लव बसीने, माजी पंचायत समिती सदस्य चैनलाल मसरके, देवसिंग सवालाखे, बाळू सेलोकर, रत्ना मेश्राम, राजकुमारी लील्हारे, बोंद्रे, अंकुश बिरणवारे, ज्ञानेश्वर बिरणवारे, देवेंद्र सहारे, कर्मचारी सुखराम आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.