भंडारा : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून गावात वैयक्तिक आणि सामुदायिक स्वरूपाच्या स्वच्छता सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देऊन
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या योग्य अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी केले.
विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांचा त्यांचा दौरा पार पडला. भंडारा जिल्ह्यातील गोंड उमरी येथे त्यांनी नुकत्याच दिलेल्या भेटी दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच अल्का उपरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संघमित्रा कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख, साकोलीचे गटविकास अधिकारी नंदागवळी, नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किटे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राठोड, उपविभागीय अभियंता हितेश खोब्रागडे, सचिव हेडावू, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अजय गजापुरे, लेखाधिकारी प्रशांत फाये, स्वच्छता तज्ज्ञ गजानन भेदे, समूह समन्वयक जनार्दन डोरले, निरंजन गणवीर उपस्थित होते.
महाजन म्हणाले, यापूर्वी स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात मिशन मोडवर नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या सुविधांचा फायदा आता ग्रामस्तरावर दिसतो आहे. त्या प्रमाणेच आता ग्रामस्तरावर शाश्वत स्वरूपाच्या स्वच्छता सुविधा उपलब्ध करून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावयाचे आहे. याकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असून त्यामुळे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला कार्यात्मक नळ जोडणी द्यावी आणि सार्वजनिक शौचालयांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले.
अभय महाजन यांनी, साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत गोंड उमरी येथे भेट देऊन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची पाहणी व आढावा घेतला. गोंड उमरी गावात उपलब्ध होऊ घातलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प , सार्वजनिक शौचालय तसेच वैयक्तिक शौचालय बांधकामाबाबत पहाणी केली. त्यांनी, ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर ग्रामस्थ यांचेशी चर्चा करुन वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावर स्वच्छता सुविधा शाश्वत स्वरूपाच्या उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले.