तुमसर (भंडारा) : आयटीआयच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचा मनावर आघात बसल्याने आत्महत्येचा विचार मनात येऊन ‘रेस्ट इन पिस’ असे व्हाॅट्सॲप स्टेटस ठेवून वैनगंगा नदीत तरुणाने उडी घेतली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र पाेलीस आणि बचाव पथकाने रविवारी, सोमवार व मंगळवारी बचाव पथकासोबत शोधमोहीम राबविल्यानंतरही ताे गवसला नाही. ५५ तासांपेक्षा अधिक वेळ झाला तरी तरुणाचा शोध न लागल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तुमसर येथील अनुराग विजय गायधने (१७, रा. शहर वॉर्ड, तुमसर) हा तरुण बजाजनगर येथील न्यू तुलसी खासगी औद्याेगित प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्रीचा विद्यार्थी हाेता. अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. या निकालाबाबत त्याला शनिवारी माहिती मिळाली. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला. अशात ताे रविवारी पहाटेच्या सुमारास सायकलने वैनगंगा नदीपात्राजवळ आला. तत्पूर्वी त्याने व्हाॅट्सॲपवर ‘श्रद्धांजली’चे स्टेट्स ठेवले. नंतर त्याने वैनगंगा नदीत उडी मारल्याची शक्यता आहे. ही बाब कुटुंबीयांना माहिती हाेताच त्यांनी देव्हाडी पाेलिसांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच पाेलीस आणि शाेधपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रविवार, सोमवार व मंगळवारी तब्बल ३० ते ३२ तास शाेधमाेहीम राबविली. परंतु सदर तरुण कुठेही आढळून आला नाही. अनुराग हा सायकलने माडगी येथे आला होता. सदर सायकल त्याने नदीकाठावर ठेवली होती. सायकलीवर त्याने कोट ठेवला होता. मंगळवारी बचाव पथक व पोलिसांनी पुन्हा माडगी, बाम्हनी, चारगाव, देव्हाडा, करडी, मुंढरी येथील नदीपात्रात शोधमोहीम राबविली. दरम्यान, त्यांना सदर तरुण आढळला नाही. प्रकरण अजून गूढ होत चालले आहे. मंगळवारी तुमसरचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, देव्हाडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने, पोलीस सुधीर धमगाये, जय लिल्हारेंसह इतर पोलिसांची घटनास्थळी युद्धस्तरावर शोध मोहीम सुरूच आहे.