शासनजमा शेतजमीन मोकळी असल्याचे तलाठी यांच्या पत्राद्वारे स्पष्ट झाले असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून कारवाईच्या प्रतीक्षेत पूर्ववत शेतजमिनीची मागणीसंदर्भात न्यायाची अपेक्षा वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सततच्या पाठपुराव्याची दखल घेत शासनजमा एक हेक्टर शेतजमीन पूर्ववत मूळ मालकाचे नावे करून, शेतजमीन मागणीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत सादर करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिले आहे. यासंदर्भात मोका चौकशी अहवाल सादर करण्याचे पत्र तहसीलदार यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहे.
चंद्रभान मारोती हेडाऊ असे अन्यायग्रस्त वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. भूमिधारी हक्काने वहिवाटीकरिता शासनाने शेतजमिनीचा पट्टा दिला. त्यावर चरितार्थ सुरू होता; मात्र निसर्गाची वक्रदृष्टी होऊन दुष्काळ ओढवला. बिकट परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती हलाखीची असल्याने गावातीलच गर्भश्रीमंत पाटलाला क्षुल्लक रकमेत तात्पुरती कसायला दिली असता, बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनीवर कायमस्वरूपी कब्जा केल्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी साकोली यांचे न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्ट झाले होते.