लाखनी (भंडारा) : घरची हलाखीची गरिबीची परिस्थिती. वडील अल्पभूधारक शेतकरी. तरीही मनात जिद्द... जिंकण्याची! "जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी" या वाक्याचा प्रत्यय जिल्हावासीयांना प्रत्यक्षात करून दाखविला आहे तेजस्विनी लांबकाने या मुलीने.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील नान्होरी (दिघोरी) येथील नरेंद्र लांबकाने यांची तेजस्विनी कन्या. गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने पाच किमी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळ येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
असं म्हणतात की कोणते यश हे परिस्थितीपेक्षा मनस्थितीवर अवलंबून असते. परिस्थिती कशी असू द्या मनस्थिती जर चांगली असेल तर सुयश निश्चितच मिळते. तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि याचे उदाहरण म्हणजे लाखनी तालुक्यातील नान्होरी येथील तेजस्विनी नरेंद्र लांबकाने.
समर्थ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत
लाखनी येथील समर्थ विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ॲथलेटिक्समध्ये खेळायला जाणारी धावपटू तेजस्विनी लांबकाने हिला नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय धावणे स्पर्धेत जाण्यासाठी आर्थिक मदत करून समाजऋण सध्या केले आहे. या आधी या ग्रुपच्या माध्यमातून समाजातील गरीब होतकरू महिला, विद्यार्थी, अनाथ आणि विधवांना वेळोवेळी मदत केली जाते. या बॅचमधील विद्यार्थी उच्च पदस्थ आणि देश-विदेशात असून समाजासाठी नेहमीच काम करीत असतात. नेपाळ येथे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत आर्थिक अडचणीत भाग घेता येत नव्हते. त्यांनी डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांना भेटून आपली अडचण सांगितली आणि लगेचच त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्रांशी सल्लामसलत करून डॉ. चंद्रकांत निबार्ते, डॉ. मनीषा निबार्ते, डॉ. गणेश मोटघरे, श्रीधर काकिरवार, प्रीती पाटील, गिरीष लांजेवार यांच्या हस्ते धावपटू तेजस्विनी लांबकानेला धनादेश दिला.
मला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. मी माझ्या वडिलांच्या प्रेरणेने धावपटू झाली. मी गोवा येथे झालेल्या पाच किलोमीटर स्पर्धेत भाग घेतला आणि तिथे प्रथम क्रमांक मिळवला. आता १४ फेब्रुवारीला नेपाळ येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तेजस्विनी लांबकाने, धावपटू