शेतीला बारामाही सिंचनाची सोय उपलब्ध होईल, या हेतूने उपसा सिंचन योजना वैनगंगा नदीच्या तीरावर कार्यान्वित करण्यात आल्या. या योजनेअंतर्गत अनेक गावांना उपसा करून पाण्याची सोय करून देण्यात आली होती. मात्र या वर्षी परिसरामध्ये पावसाने दगा दिल्याने अनेकांची रोवणी खोळंबलेली आहे. त्यामुळे या सिंचन योजनेचे पाणी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या योजनेचे पाणी यावर्षी शेतीपर्यंत पोहोचलेच नाही. सुरुवातीला शेतकरी पाणसारा देत नसल्याने ही योजना सुरू करण्यात येणार नसल्याचे संबंधित विभागाचे मत होते. मात्र आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे या योजना सुरू करण्यात आल्या. मात्र दोन-तीन दिवस सुरळीत योजना सुरू राहिल्यानंतर त्या बंद पडल्या. काही मोटारी जळल्या तर विद्युत बिल वेळेवर भरणा केले नसल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आल्याचे बोलले जात असल्याने या योजना बंद पडल्या आहेत.
शेतीसाठी आता पाण्याची नितांत गरज असून आठ ते दहा दिवसांत जर रोवणी झाली नाही तर धान उत्पादनामध्ये फार मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे या योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी परिसरातील जनतेने केलेली आहे.