भंडारा : हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यात मान्सून वेळेवर दाखलही झालाही. मात्र, गत काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने बळीराजाला पावसाची चिंता सतावत आहे. त्यातच वाढत चाललेले तापमान आणि पावसाचा खंड यामुळे बळीराजा धास्तावला आहे. साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी साेयाबीनचे पेरणी केली आहे. पिके वाढीस लागली आहेत. मात्र, काही कारणास्तव काही जणांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली आहे. अनेकांनी धानाची नर्सरी टाकली आहे. सातत्याने पाऊस काेसळत नसला तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने अद्यापतरी जिल्ह्यात दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवलेली नाही. मात्र, राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अद्यापही पावसाने उघाड दिली असल्याने तेथे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय आहे, अशा शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अपेक्षित पाऊस न पडल्यास यावर्षीही धान राेवणीला विलंब हाेण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धानाचे पऱ्हे लागवडी याेग्य झाले असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणू लागले आहेत.
बॉक्स
साेयाबीनचा पेरा घटला
जिल्ह्यात प्रमुख धान पीक हे पीक असले तरी आजही जिल्ह्यात साेयाबीन, तूर, कापूस काही प्रमाणात घेतला जाताे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, माेहाडी तालुक्यांत अनेक शेतकरी साेयाबीनचे उत्पादन घेतात जिल्ह्यात ५०० हेक्टरवर साेयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचे क्षेत्र घटले असून, भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यासाेबतच तूर, भाजीपाला पिकाचीही लागवड केली असून, आता पाऊस कधी पडतो याची चिंता बळीराजाला लागली आहे.
बॉक्स
४ जुलैपर्यंत २,०८८.९ पाऊस
जिल्ह्यात कडधान्य पिकाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. भातपिकाला जुलै महिना ते १,७७०.५ इतका अपेक्षित पाऊस हाेता. मात्र, त्या तुलनेत ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात २,०८८.९ इतका प्रत्यक्षात पाऊस झाला असल्याने अजूनतरी दुबार पेरणीची वेळ आलेली नाही. अधूनमधून काेसळत असलेला पाऊस लक्षात घेता शेतशिवारातील धानाचे पऱ्हे लागवडीयाेग्य झाले आहेत.
काेट
देव अशी परीक्षा का घेताे...
अन्नदात्याला दरवर्षीच विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्ग काेपला आहे. कधी महापूर तर कधी पावसाचा खंड, कधी पीक चांगले आलेच, तर कधी कीडराेगाचे आक्रमण हाेते. बळीराजाची देव अशी परीक्षा का घेताे, असे शेतकरी म्हणतात. मात्र, पर्यावरणाच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार आहाेत. वृक्षलागवडीसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा.
-तानाजी गायधने, शेतकरी
काेट
माझ्या बालपणी जून, जुलै महिन्यात धाे-धाे पाऊस पडायचा. मात्र, दिवसेंदिवस आता हे चित्र बदलत आहे. आता पाऊस नाही. मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अति पर्जन्यवृष्टीने साेयाबीन, भाजीपाला पिकाचे अताेनात नुकसान हाेते. त्यामुळे निसर्गही बळीराजाची दरवर्षीच परीक्षा घेताे.
-मृणाल घाटाेळे, शेतकरी
काेट
गतवर्षी जिल्ह्यात ४ जुलै २०२० पर्यंत १,९२९.५ इतका पाऊस झाला हाेता. १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्हृयात सरासरी ९,३११.५ इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील धानपीक हे प्रमुख पीक आहे. अजून अनेकांची धानराेवणी व्हायची आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ जुलैपर्यंत २,०८८.९ इतका पाऊस झाला आहे. भाजीपाला तूर, साेयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, अजूनतरी दुबार पेरणीचा धाेका नाही. सिंचनाची साेय असणारी शेतकरी राेवणी करीत आहे.
-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा