लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीपात्रातील नृसिंग नरसिंह मंदिराला पाण्याने वेढा घातला आहे. बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीला पुर आला आहे. तुमसर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासापासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गर्रा बघेडा परिसरात १०३ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याने नाले दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी तहसील कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली. लाखनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील मानेगाव येथील बोडी ओव्हरफ्लो झाल्याने पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. संततधार पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहन आहे.
तालुक्यातील पालांदूर परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावून चुलबंद खोऱ्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. पालांदूर येथे ५१.४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपडत असून संततधार पावसाने चांगलाच धास्तावला आहे. लाखांदूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.