भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा नवजात निष्पाप बालकांचा जळाल्याने आणि श्वास गुदमरून मृत्यू झाला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. शनिवारी पहाटे २ वाजता अग्नितांडवात चिमुकल्यांचा बळी गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यांच्या मातांचा आक्रोश आसमंत भेदून टाकत होता. ही आग शार्टसर्किट की इनक्युबेटर जळाल्याने लागली, याचा तपास केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षातून शनिवारी पहाटे अचानक धूर निघत असल्याचे समोर आले. हा प्रकार ड्युटीवर असलेल्या नर्सने बघितला. त्यांनी दार उघडून बघितले असता रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवानही पोहचले हाेते. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात झाली. धुरामुळे आतमध्ये अंधार पसरलेला होता. टॉर्च आणि मोबाईलच्या प्रकाशात बचाव मोहीम सुरू झाली. या युनिटमध्ये १७ बालके उपचारासाठी ठेवण्यात आली होती. त्यात आऊट बॉर्न युनिटमध्ये १० तर इन बॉर्न युनिटमध्ये सात बालके होती. इन बॉर्न युनिटमधील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र आऊट बॉर्न युनिटमधील तीन बालकांचा भाजल्याने आणि सात बालकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते पहाटे ३ वाजताच रुग्णालयात दाखल झाले. पहाटे ५.३० वाजता पोहचताच आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल यांनी रुग्णालयाचा आढावा घेतला. पोलिसांचा रुग्णालयाबाहेर तगडा बंदोबस्त लावण्यात आला. कुणालाही आतमध्ये सोडले जात नव्हते. मात्र तोपर्यंत रुग्णालयात दहा बालकांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती शहरभर पसरली. नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले. बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी अहवाल सादर केला. अग्नितांडवात बळी पडलेल्या नऊ नवजात बालकांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास देण्यात आले. शासकीय वाहनाने त्यांना त्यांच्या गावी रवाना केले.
बॉक्स
मातांचा आक्रोश
आग लागल्याची माहिती होताच या बाळांच्या माता आणि नातेवाईकांनी या कक्षाकडे धाव घेतली. सुरुवातीला काय झाले हेच कळत नव्हते. आपले बाळ सुखरूप आहे काय हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक माता आक्रोश करीत होती. या सर्व मातांना रुग्णालयाच्या पोर्चमध्ये बसविण्यात आले. नेमके कुणाचे बाळ दगावले आणि कुणाचे जिवंत आहे याचा ताळमेळ लागत नव्हता. ज्यांना आपले बाळ गेल्याचे कळले त्यांनी तेथेच हंबरडा फोडला. काही माता प्रसूतीनंतरच्या वेदना विसरून माझ्या बाळाला वाचवा हो, असा टाहो फोडत डॉक्टरांच्या मागे धावल्या. या हृदयद्रावक घटनेने डॉक्टर, परिचारिका यांनाही रडू कोसळले.
बॉक्स
यांच्या बालकांचा गेला बळी
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्नितांडवात साकोली तालुक्यातील उसगाव येथील हिरकन्या हिरालाल भानारकर यांची बालिका, मोहाडी तालुक्यातील जांब येथील प्रियांका जयंत बसेशंकर यांची मुलगी, भंडारा तालुक्यातील श्रीनगर पहेला येथील योगिता विकेश धुळसे यांचा बालक, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथील सुषमा पंढरी भंडारी यांची बालिका, भंडारा तालुक्यातील भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांची बालिका, मोहाडी तालुक्यातील टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले यांची बालिका, मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील सुकेशनी धर्मपाल आगरे यांची बालिका, तुमसर तालुक्यातील सीतेसारा (आलेसूर) येथील कविता बारेलाल कुंभारे यांची बालिका, भंडारा तालुक्यातील रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम यांची बालिका आणि एका अज्ञात बालकाचा समावेश आहे.
बॉक्स
जुळ्यासह सात बालके सुरक्षित
अग्नितांडवातून वाचविण्यात आलेल्या सात बालकांमध्ये जुळी बालके आहेत. त्यांच्यावर विशेष वॉर्डात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये दीक्षा दिनेश खंडाईत यांच्या दोन जुळ्या बालिका, श्यामकला शेंंडे यांची बालिका, अंजना युवराज भोंडे यांची बालिका, चेतना चाचेरे यांची बालिका, करिश्मा कन्हैया मेश्राम यांची बालिका आणि सोनू मनोज मारबते यांच्या बालिकेचा समावेश आहे.
बॉक्स
यांनी दिल्या भेटी
गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री संजय राठोड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाला भेटी दिल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. फडणवीस यांनी दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.