साकोली (भंडारा) : तालुक्यात गौण खनिज तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे. हा गोरखधंदा गत अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. साकोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दहा आरोपींना अटक केली असून चार टिप्पर दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी, असा एकूण एक कोटी ६२ लाख रुपयाच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
साकोली तालुक्यात सुंदरी व पाथरी येथे दोन वेगवेगळ्या गौण खनिज तस्करांविरोधात झालेल्या कारवाईमध्ये उघड झाले आहे. साकोली, सडक अर्जुनी व देवरी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण कार्य सुरू आहे. रविवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, चारगाव फाटा ते सुंदरी रोडवर चुलबंद नदीच्या पिपरी रेती घाटावरून पाच ते सहा टिप्पर जेसीबीच्या सहाय्याने रेती उपसा करून देवरीकडे जाण्याच्या मार्गावर आहेत.
सूचना मिळताच ठाणेदार जितेंद्र बोरकर यांनी आपल्या समोर चमूसह घटनास्थळ जवळ पोहोचून नाकाबंदी केली. दरम्यान तिथे एका जेसीबी सह, तीन टिप्पर रीतीने भरलेले मिळाले, व एक टिप्पर रिकामा मिळाला. रात्रीच्या वेळेस अवैधरीत्या गौण खनिज रेतीचे उत्खनन विना रॉयल्टीने करीत असल्याचे निदर्शनास आले. अग्रवाल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे व साईड मॅनेजर वरुण या दोन आरोपींसह टिप्पर चालक आरोपी महेश इशाक शेंडे रा. निलागोंदी, नीलेश हरी खंडाते रा. नवेगाव, मनोजकुमार पुरण पासवान रा. बारीगाव झारखंड, अजय उखमा यादव रा. खोंबीकला झारखंड, इम्तियाज नबी रसूल अन्सारी रा. दलेली झारखंड, या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.