व्यथा ‘त्या’ ७१ मजुरांची : पाच वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेतआलेसूर : जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात वनवैभव प्राप्त असलेल्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत वन व वनालगत असलेल्या तेंदुपत्ता संकलनधारक मजुरवर्ग ५ वर्षापासून बोनसच्या प्रतिक्षेत आहेत. बँक व यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे ७१ मजुर, २ लक्ष ९१ हजार ७१३ ऐवढ्या प्रोत्साहन निधीपासून वंचित आजही आहेत.भंडारा उपवन कार्यक्षेत्रातील १० वनपरिक्षेत्राचे प्रोत्साहन पर अनुदान तेंदु विभाग कार्यालया अंतर्गत अॅक्सेस बँक शाखा भंडारा कार्यालयाचे खाते क्रमांक व धनादेश क्रमांक अंतर्गत एकूण मजुर संख्या ६२१ यात लेंडेझरी वन परिक्षेत्रांंतर्गत तेंदु संकलन धारकांची यादी व बँकेतील खाते क्रमांक त्यांचे नावे जमा करण्याची सुची संबंधीत शाखेला देण्यात आली.त्यापैकी सदर लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील ७१ मजुरांना, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा गर्रा बघेडा या शाळेत २,९१७१३ रूपये जमा झाले नाही. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी लेंडेझरी यांनी वरिष्ठ अधिकारी व अॅक्सेस बँक शाखा भंडारा येथील शाखा व्यवस्थापक यांना वेळोवेळी पत्र व्यवहार व कित्येक स्मरणपत्र सुद्धा दिले आहे.मात्र आतापर्यंत ५ वर्षांचा कालावधी लोटूनही तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन धारकांना त्यांच्या खात्यावर एकही रूपया जमा झाला नाही. या संदर्भात आलेसूर येथील सरपंच गोपीका मेहर यांनी भंडारा उपवन संरक्षक अधिकारी यांना रितसर अर्ज करून खुलासा मागविला आहे. त्यात संबंधीत शाखा व तेंदुपत्ता विभाग भंडारा यांच्या कार्यप्रणालीचे बिंग फुटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत उपवन संरक्षक अधिकारी भंडारा यांनी संबंधित शाखेला ताकीद देत मुख्य क्षेत्रीय प्रबंधक, शाखा नागपूर व मुख्य प्रबंधक अॅक्सेस बँक मुंबई यांना सदर प्रकरणी संबंधित शाखेस त्वरीत मजुरांचे बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचे कळविले आहे. या दरम्यान कित्येक मजुरांनी वन विभाग कार्यालय व संबंधित बँक शाखेत आपले उंबरठे झिझविले आहेत. मात्र, त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यांना आपल्या श्रमाचा मोबदला मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. मात्र या कागदी घोड्यांच्या युद्धात त्यांना त्यांचा मोबदला मिळेल काय, याकडे संपूर्ण मजुर वर्गाचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
तेंदूपत्ता संकलन धारक निधीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 12:33 AM